पै. अनिल ब्राम्हणे याने कुस्ती चितपट करुन पटकावली मानाची चांदीची गदा
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुंडेगाव (ता. नगर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. शेवटची मानाची कुस्ती पै. अनिल ब्राम्हणे (ब्राम्हणी, ता. राहुरी) विरुध्द पै. अंगद बुलबुले (बारामती) यांच्यात झाला. या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर पै. ब्राम्हणे याने पै. बुलबुले याला चितपट करुन भैरवनाथ केसरीचा मान मिळवून मानाची चांदीची गदा व 21 हजार रुपये रोख बक्षिस पटकाविले.
कुस्त्यांच्या डावपेचांनी मल्लांनी उपस्थितांची वाहवाह मिळवली. एकशे एक रुपयापासून तर एकवीस हजार रुपया पर्यंन्त लावण्यात आलेल्या मल्लांच्या कुस्तीचा थरार रंगला होता. या निकाली कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तर हगाम्यात जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव केला. शेवटच्या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा व 21 हजार रुपये रोख बक्षिस कै. केरु सहादू भापकर यांच्या स्मरणार्थ भापकर परिवाराच्या वतीने देण्यात आले. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव पै. बाळू भापकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन पोपट भापकर, पै. रतन भापकर, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, त्रिदल सैनिक संघाचे सर्व पदाधिकारी, उपसरपंच संतोष भापकर, माजी सरपंच संजय कोतकर, माजी उपसरपंच सुनिल भापकर, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, क्रीडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, मेजर पै. झुंबर भापकर, पै. बापू चौधरी, पै. रामदास हराळ, पै. मिलिंद जपे, पै. गोरख शिर्के, अशोक घोडके आदी उपस्थित होते.
पै. संदिप डोंगरे, पै. सौरभ शिंदे, सौरभ मराठे, कावरे यांच्या प्रेक्षणीय कुस्त्या रंगल्या होत्या. आखाडा यशस्वी करण्यासाठी त्रिदल सैनिक संघाच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. कुस्तीचे समालोचन अक्षय मुळूक यांनी केले.