• Thu. Dec 12th, 2024

क्रांतिकारी हबीब खान यांच्या इतिहासाशी जोडलेल्या व पहिल्या महायुध्दाच्या सरोषबागेतील स्मारकाची विटंबना थांबवावी

ByMirror

Aug 17, 2022

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन

सरोषबागेचे पुनर्जीवन करुन क्रांतिकारी हबीब खान यांचे स्मारक बांधण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना सरोष टॉकीजमध्ये बॉम्बस्फोट घडविणारे क्रांतिकारी हबीब खान यांच्या इतिहासाशी जोडलेल्या व पहिल्या महायुध्दातील शहिदाच्या गौरवार्थ बांधण्यात आलेल्या सरोषबागेतील स्मारकाची विटंबना थांबवावी आणि सरोषबागला पुनर्वैभव प्राप्त करुन उद्यान विकसीत करण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली.

या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, शहानवाझ शेख, अकलाख शेख, अब्दुल खोकर, वसिम शेख, मिजान कुरेशी, जहीर तांबोली, हाफीज शेख, फैरोज पठाण, वसिम शेख, मुंतेजर शेख, इरफान शेख, मोहसीन खान आदी उपस्थित होते.


देशात केंद्र व राज्य सरकारकडून तसेच महापालिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मात्र देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देऊन शहरातील सरोष टॉकीजमध्ये ब्रिटीश सैनिकांना धडा शिकविण्यासाठी बॉम्बस्फोट घडविणारे क्रांतिकारी हबीब खान यांच्या इतिहासाशी संबंध असलेल्या आणि पहिल्या महायुध्दातील शहिद जवानांच्या गौरवार्थ सरोषबागेत बांधण्यात आलेल्या स्मारकाची सध्या विटंबना सुरु आहे. सरोषबागेची मोठी दुरावस्था झाली असून, महापालिका प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


शहराच्या उड्डाणपूलाचे काम सुरु असून, या बागेत उड्डाणपूलाचे टाकाऊ बांधकामाचे साहित्य आणून टाकले जात असून, या उद्यानाची संरक्षक भिंत देखील पडली आहे. या परिसरात पुर्णत: अस्वच्छता पसरली असून, जंगली व काटेरी झाडे वाढली आहे. झेंडीगेट भागासाठी हे चांगले उद्यान असून, याला विकसीत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवा निमित्त स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे हबीब खान यांच्या कार्याची जाणीव ठेऊन व पहिल्या महायुध्दाचे स्मारक असलेल्या सरोषबागची महापालिकेने तातडीने स्वच्छता करावी, या बागेत स्वातंत्र्य सैनिक हबीब खान यांचे स्मारक उभारावे, दुरावस्था झालेल्या सरोषबागेचे पुनर्जीवन करुन उद्यान विकसीत करण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन, सरोषबागेच्या झालेल्या दुरावस्थेचे बॅनर महापालिकेच्या प्रवेशद्वाराला टांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *