आशांनी जीवावर उदार होऊन, सेवाभावाने दिलेले योगदान समाज विसरणार नाही -अविनाश घुले
अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालाच पाहिजे. आशा सेविकांनी मोठ्या धाडसाने गावातील वाडी-वस्तीवर जाऊन आरोग्य सेवा पोहचवली. पैशाला महत्त्व न देता, त्यांनी जीवावर उदार होऊन सेवाभावाने दिलेले योगदान समाज विसरणार नसल्याचे प्रतिपादन हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सन्मान करण्यात आला. मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतच्या सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात घुले बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, आयटकचे राज्य उपाध्यक्ष अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, लाल बावटा कामगार संघटनेचे सतीश पवार, भाकपच्या सहसचिव कॉ. भारती न्यालपेल्ली, प्रकल्प अधिकारी सुनिल गोसावी, शेवगाव तालुकाध्यक्ष संजय नांगरे, आशा संघटनेच्या कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, सचिव मधुकर केकाण, गोविंद सांगळे आदी उपस्थित होते.
पुढे घुले म्हणाले की, अन्याय झाल्यास व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी संघटनेचे बळ महत्त्वाचे ठरते. ज्यांना तोटा होतो, ते संघटना फोडण्याचे काम करतात. व्यवस्थे विरोधात एकट्याने लढणे अशक्य असून, त्यासाठी संघटनेची गरज आहे. श्रमिकांच्या संघर्षातून हमाल पंचायत उभी राहिली आहे. त्यांचे प्रश्न सोडवायचे कार्य सतत सुरू आहे. आशा सेविकांनी केलेल्या कामाची निश्चित शासनस्तरावर दखल घेतली जाणार असून, शासन स्तरावर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविकात अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, आयटक ही सर्वात मोठी कामगार संघटना आहे. देशातील विविध घटकातील कामगारांच्या न्याय, हक्कासाठी संघटनेचे संघर्ष सुरु आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहे. आशा सेविकांना मानधन वाढविण्यासाठी संघटनेने मोठा लढा दिला. आशा सेविकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात तीन हजार आशा सेविका व दोनशे गट प्रवर्तकांना कोरोना काळात केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन, कामगारांना घातक असलेल्या केंद्र सरकारचे कोड बील रद्द होण्यासाठी 28 व 29 मार्चच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.
संजय नांगरे म्हणाले की, कोरोना काळात आशा व गटप्रवर्तक यांनी केलेल्या कामाचे शासन-प्रशासनाने कौतुक केले. मात्र त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली नाही. व्यवस्थेने पाठीवर थाप दिली, पण त्यांच्या उपाशी पोटाची जाणीव ठेवली नाही. आशांनी कोरोना काळात केलेल्या कामाच्या मानधनासाठी त्यांना भांडावे लागले ही शोकांतिका आहे. कोरोना काळात गावात जाऊन काम करताना त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. तरीदेखील त्यांनी मोठ्या धैर्याने आरोग्य सेवा दिली. या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्याचे त्यांनी सांगितले. सुवर्णा थोरात यांनी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून दखल घेऊन अशा सेविकांच्या मानधनात वाढ झाली. मात्र या महागाईच्या काळात आशांना जीवन जगणे कठीण झाले असून, न्याय-हक्कासाठी कायद्याच्या चौकटीत राहून पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगितले.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, कोरोनानंतर देशातील श्रीमंत अजून श्रीमंत झाले आहे. तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य होरपळत असून, त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगारवर्ग नाहीरे वर्गात मोडत असून, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना आपल्या हक्कासाठी संघटित होऊन लढा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोमल कासार व अनिता अरने या आशा सेविकांनी आपले प्रश्न मांडले. उपस्थितांच्या हस्ते कोरोना काळात कार्य करणार्या आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गोसावी यांनी केले. आभार कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.