अध्यक्षपदी प्रा. बाळकृष्ण सिद्दम, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर मंगलारम व सचिवपदी प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल यांची निवड
अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरामध्ये गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी प्रा. बाळकृष्ण सिद्दम, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर मंगलारम व सचिवपदी प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल यांची निवड करण्यात आली.
या बैठकित कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील ध्येय-धोरणवर चर्चा करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी विनायक बत्तिन, सहसचिवपदी – अशोक कुरापाटी, कृष्णा संभार , खजिनदारपदी शंकर नक्का , हिशोब तपासणीसपदी भुमय्या नक्का यांची नियुक्ती झाली आहे.
बैठकीच्या प्रारंभी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष कै. विठ्ठलराव मंगलारम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी शिक्षक दिन, पदविका-पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिके, कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन जयंती व पुण्यतिथी रोजी विविध स्पर्धा व पारितोषिके वितरण, गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात.