• Thu. Dec 12th, 2024

केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलला ई लर्निंगसाठी 15 एलईडी टिव्ही भेट

ByMirror

Jul 7, 2022

पारंपरिक शिक्षणात बदल घडवून शिक्षणात अद्यावत पॅटर्नचा अवलंब करण्याची गरज -इंद्रभान डांगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेच्या युगात पारंपरिक शिक्षणात बदल घडवून शिक्षणात अद्यावत पॅटर्नचा अवलंब करण्याची गरज आहे. या कसोटीस जे.एस.एस. गुरूकुल खर्‍या अर्थाने उतरले आहे. भविष्यातील आव्हाने आणि त्यानुसार शिक्षणाच्या पद्धतीत बदल करून विद्यार्थीभिमुख शिक्षण दिल्यास गुणवंत विद्यार्थी घडणार असल्याची भावना शिक्षणतज्ञ प्राचार्य इंद्रभान डांगे यांनी व्यक्त केली.


केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये पालक-शिक्षक मेळावा व शाळेच्या ई लर्निंग वर्गासाठी मिळालेल्या 15 एलईडी टिव्ही लोकार्पण सोहळ्याप्रसंगी डांगे बोलत होते. याप्रसंगी माधुरी संजय कुलकर्णी, स्कुलच्या प्राचार्या निकिता कटारिया, संस्थापक आनंद कटारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


डांगे पुढे म्हणाले की, मुलांना स्पर्धेत उतरविताना इतरांशी तुलना करण्याचा पालकांनी हट्टाहास करु नये. आपल्या पॅटर्ननुसार बालकाला घडवावे. विद्यार्थ्यांना कळकळीने शिकविणे व घडविणे हा शिक्षकांचा खरा धर्म आहे. पालक व शिक्षक यांनी एकमेकांवर अवलंबून न राहता बालकांचे भवितव्य घडवावे. बालकांना शिक्षण व संस्कार देणे हे देश सेवेचेच काम असून, ते पालक व शिक्षकांनी प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे. जे.एस.एस. गुरूकुल हे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देवून विद्यार्थी मध्ये संस्कार देखील रुजवत असल्याचे त्यांनी सांगितले.


अमेरिकेत कॅन्सर तज्ञ असलेले डॉ. नागेश देशपांडे यांच्या आर्थिक सहयोगातून व माधुरी कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने जे.एस.एस. गुरुकुलच्या ई लर्निंग वर्गासाठी 15 एलईडी टिव्ही यावेळी भेट देण्यात आले. प्रास्ताविकात आनंद कटारिया यांनी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण दिले जात आहे. भौतिक सुविधांबरोबरच गुणवत्तेला महत्त्व देवून शाळेतील प्रत्येक शिक्षक नवीन अध्यापन पद्धतीतून योगदान देत आहेत. धार्मिक घटकांना मोठ-मोठ्या देणग्या देताना जेथे भावी पिढी घडविली जाते अशा ज्ञानमंदिरांना मदत करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या निकिता कटारिया यांनी करुन शाळेच्या गुणवत्तेचा वाढता आलेख सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम भंडारी व माधवी जक्कल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *