कॅन्सर निवारण जनजागृती सप्ताहातंर्गत आय.एम.एस. मध्ये व्याख्यान
अहमदनगर (प्रतिनिधी)- कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपत नसते. पूर्वीपेक्षा सध्याची निदान व उपचार पध्दती प्रभावी असल्याने योग्य वेळेत उपचार घेतल्यास कॅन्सरपासून मनुष्य वाचतो व निरोगी आयुष्य पुन्हा जगतो. कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत निदान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी केले.
जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने जागतिक कर्करोग (कॅन्सर) निवारण दिनानिमित्त निमित्त सुरु असलेल्या जनजागृती सप्ताहातंर्गत शहरातील आय.एम.एस. महाविद्यालयात कॅन्सर विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सोनवणे बोलत होते. यावेळी आय.एम.एस. महाविद्यालयाचे संचालक डॉ.एन.डी. मेहेता, उपसंचालक विक्रम बार्नबस, जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संजय गुगळे, जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा विद्या तन्वर, सचिव पूजा पाथुरकर, कॅन्सर तज्ञ डॉ. सतीश सोनवणे, प्रकाश कटारिया, गणेश भुस्सा आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. सोनवणे म्हणाले की, कॅन्सर, हा असाध्य रोग अशी एक गैरसमजूत आहे. कॅन्सरचे योग्य वेळी निदान व उपचार कॅन्सर तज्ञांकडून केले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सरची अनेक कारणे आहेत. कॅन्सरची चाहूल ही शरीरात कोणत्याही भागात अचानकपणे आलेली गाठ, विशेषत: स्तनात व मानेमध्ये आलेली गाठ, हळूहळू वाढणारी औषधाने बरी न होणारी जखम किंवा कातडी, ओठ, तोंड व जीभ इत्यादी ठिकाणी झालेली जखम, औषधाला दाद न देणारा खोकला किंवा घशात घोगरा आवाज, अगर आवाजात पडलेला फरक या गोष्टींमुळे प्राथमिक अवस्थेत कॅन्सर ओळखता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात विद्या तन्वर यांनी जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सरच्या जनजागृतीवर सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. संजय गुगळे यांनी भारतात तंबाखू व सिगारेट ओढण्याने युवकांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. वेळेवर निदान व उपचार न झाल्याने बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनला आहे. नागरिकांना कॅन्सरबद्दल अधिक माहिती व्हावी व या आजाराला पायबंद होण्यासाठी जनजागृती गरजेची असून, त्या दृष्टीकोनाने कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आय.एम.एस. महाविद्यालयाचे संचालक डॉ.एन.डी. मेहेता यांनी कॅन्सरच्या जनजागृतीसाठी जायंट्स व अजय फाऊंडेशन राबवित असलेली जनजागृती मोहिम कौतुकास्पद आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व निदान यंत्रे (पीसीपीएनडीटी) लिंग निवडीस प्रतिबंध (कायदा 1994) कमिटीच्या सल्लागारपदी संजय गुगळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॅन्सर जनजागृतीवर डॉ. सोनवणे लिखित सभागृहात उपस्थितांना पुस्तके वाटण्यात आली.