मार्केटयार्ड मधील गाळ्याच्या वादाला राजकीय वळण देऊन माळी समाजाची बदनामी थांबवावी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड मधील गाळ्याच्या वादाला राजकीय वळण देऊन औसरकर कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी शहरातील माळी समाज बांधव, फुले ब्रिगेड व ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे सुपारी घेऊन गाळा खाली करण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप सुनिता अनिल औसरकर यांनी केला आहे. यावेळी बाळासाहेब भुजबळ, माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, अॅड. रासकर, अमोल लोंढे, डॉ. सुदर्शन गोरे, राजेंद्र पडोळे, अनिल बोरुडे, दत्ता गाडळकर, अमित खामकर, अजय औसरकर, दिपक खेडकर, किरण जावळे, सतीश बजाज, महेश खराडे, विकी लोखंडे, विजय औसरकर, अभिजीत बोरुडे, भाऊ पुंड, नंदू एकाडे, महेश सुडके, विशाल सुडके, ऋषीकेश ताठे, विकी शिरसाठ, योगेश खरपुडे, यशवंत गारडे, ऋषी इवले, सचिन सोनमाळी, गौरव शेरकर आदी उपस्थित होते.
औसरकर कुटुंबीयांवर मागील काही दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे. गाळ्याबाबत न्यायालयीन आदेश औसरकर कुटुंबीयांच्या बाजूने असून, त्यांच्यावर खोटे आरोप करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औसरकर कुटुंबीय व्यावसायिक असून, त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. उलट विरोधी पार्टी असलेल्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींनी व्यावहारिक वादाला राजकीय स्वरूप देऊन हा वाद चिघळविण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सर्व औसरकर कुटुंबीयांसह शहरातील माळी समाजाची देखील बदनामी करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत असल्याचे माळी समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करणार्या राजकीय व्यक्तीला समज देऊन व सखोल चौकशी करुन योग्य तपास करण्याची मागणी माळी समाज, फुले ब्रिगेड, ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच सुनिता अनिल औसरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, माझी मुले अजित व सुजित यांचे अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेती अवजारे विक्रीचा व्यवसाय आहे. मागील वर्षी जून 2021 मध्ये मुलगा अजित औसरकर याने कर्ज काढून मार्केट येथे टीपी स्किम नंबर 3 मध्ये प्लॉट नंबर 17 मधील, प्लॉट नंबर 52 येथे गाळा खरेदी केला होता. सदर दुकानांमध्ये नवीन शेती अवजारे विक्रीचा व्यवसाय चालू केला व त्यानंतर अजय बोरा व ऋषभ बोरा वारंवार आमच्या दुकानात येऊन आमच्या मुलांना व कामगारांना जागी खाली करण्यासाठी येऊन धमकावू लागले. त्यानंतर 17 ऑगस्ट 2021 रोजी मिळकतीबाबत अजय बोरा यांनी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याबाबत न्यायालयाने नुकताच 9 फेब्रुवारी 2022 रोजी निकाल आमच्या बाजूने दिला आहे. दरम्यानच्या काळात बोरा कुटुंबीयांनी वेळोवेळी माझ्या कुटुंबा विरोधात कोतवाली पोलिस स्टेशनला खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी पती अनिल औसारकर यांच्याशी संपर्क करून तडजोड करण्यासाठी दबाव टाकत होते. तर एका मंत्र्याच्या नावाने जागा खाली करण्यासाठी धमकावत होते. याप्रकरणी लालटाकी येथे आमची गाडी थांबवून एका इसमाने मी किरण काळे असल्याचे सांगून सदर जागा खाली करण्याबाबत धमकावले. 11 फेब्रुवारी रोजी आमच्या दुकानातील कामगारावर वृषभ बोरा याने धारदार शस्त्राने वार केला. त्याला आंम्ही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, रात्री उशीरा आंम्हाला आमच्यावर देखील गुन्हे दाखल झाले असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी सदर घटनेची शहानिशा करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावे, ऋषभ बोरा यांनी सशस्त्र हल्ला केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असून, दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेऊन न्याय देण्याची मागणी सुनिता औसरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.