देशातील युवकांनी एकजुटीने बेरोजगारीच्या विरोधात लढा उभारावा -सुखजिंदर महेसरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्त व थोर पुरुषांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र आले पाहिजे. केंद्रातील सरकार समाजात फुट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. देशात 2014 नंतर अनेक मोठे आंदोलने झाली, मात्र त्यामध्ये फुट पाडून दडपण्यात आली. एकमेव शेतकरी आंदोलनामागचे खरे यश एकजुट ही होती. देशातील युवकांनी एकजुटीने बेरोजगारीच्या विरोधात लढा उभारला पाहिजे. देशात परिवर्तनासाठी मागण्या व हक्काबद्दल बोलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया यूथ फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सुखजिंदर महेसरी यांनी केले.
ऑल इंडिया यूथ फेडरेशनची महाराष्ट्र राज्याची विस्तारीत कौन्सिल बैठक शहरातील रहेमत सुलतान सभागृहात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना महेसरी बोलत होते. सोळावे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच हैदराबाद येथे पार पडले. यानंतर महाराष्ट्र राज्याची विस्तारीत कौन्सिल मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अॅड.कॉ. सुभाष लांडे, एआयएसएफचे माजी राष्ट्रीय महासचिव कॉ. अभय टाकसाळ, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. भाऊराव प्रभाळे, राज्य सचिव कॉ. जावेद तांबोळी, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गिरीश फोंडे, उपाध्यक्ष कॉ. फिरोज शेख, सहसचिव कॉ. भिमा पाटील, कॉ. भैरवनाथ वाकळे, रामदास वागस्कर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष अरूण थिटे, जिल्हा सेक्रेटरी कार्तिक पासलकर, कॉ. संतोष खोडदे, ज्योतिराम हुरकुडे, सागर दुर्योधन, दिपक शिरसाठ, रजत लांडे, राजू नन्नवरे, आनंद गोलवडकर, रामहरी मोरे, आकाश शिंदे, संजय इंगोले, दिगंबर गोखरे, राहुल जगताप, दिलदार मुजावर, नितीन रांजवण, संकेत वागस्कर, तानाजी सावळे, राहूल नेहे, योगेश वागस्कर, सतीश निमसे, अमोल पळसकर, दत्ता जाधव, आकाश साठे, बबन गाढे आदींसह पंधरा जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना महेसरी म्हणाले की, आजही सत्ताधारी ब्रिटिशांप्रमाणे फोडा आणि राज्य करा, ही रणनिती वापरत आहे. सत्ताधार्यांना विरोध करण्यापेक्षा सत्ता परिवर्तनासाठी विचार व कार्य जनतेपर्यंत घेऊन जाऊन मॉडेल पर्याय उभा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मशाल पेटवून शहीद भगसिंह, राजगुरु व सुखदेव यांचा नावाचा जयघोष व इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात कॉ. भाऊराव प्रभाळे यांनी कौन्सिल बैठकीचा उद्देश स्पष्ट करुन ऑल इंडिया यूथ फेडरेशनची ध्येय धोरणे स्पष्ट केली. या बैठकित 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त भगतसिंग राष्ट्रीय रोजगार गारंटी एक्ट (बनेगा) देशात लागू करावा या मागण्यांचे निवेदन राज्यात सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना देण्याचा व 20 एप्रिलला पुण्यात डीएड, बीएड धारक, एमपीएससी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च काढण्याचा, तसेच मे महिन्यात बेरोजगारांना रोजगार द्यावा या मागणीसाठी राज्यात विभागीय जथ्थे काढण्याचा ठराव घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. जावेद तांबोळी यांनी केले. आभार रामदास वागस्कर यांनी मानले.