हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
हमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर परिसरातील सर्व अनाधिकृत अतिक्रमण हटवून अवैधधंदे बंद करावे, नोंदणीकृत हमाल पंचायतसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी व या भागात अतिक्रमण व अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणार्या एमआयडीसीच्या त्या अधिकार्याचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड, राजू गायकवाड, शरद गायकवाड, जालिंदर पंचारास, दीपक आढाव, सोमनाथ बर्डे, बाळू सोनवणे उपोषणात सहभागी झाले होते.
एमआयडीसी नवनागपूर येथे असंघटित हमाल, माथाडी कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना करून फाउंडेशनच्या संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले होते. जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्याच्या कडेला फाऊंडेशनने टपरीच्या माध्यमातून कामकाज सुरु केले होते. मात्र एमआयडीसी येथील अधिकार्यांनी संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेले कार्यालय अतिक्रमणमध्ये येत असल्याचे सांगून त्वरित हटविण्याचे फर्मान सोडले. अन्यथा जप्ती व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. फाऊंडेशनने नियमांचे पालन करुन सदरची टपरी त्वरीत हटवली. मात्र एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण असून, अनाधिकृतपणे गुटखा, मावा, गावठी दारू विक्री आणि जुगार, सट्टा टपर्यात चालतो. तर रस्त्यावर मटन व भाजी विक्रेत्यांनी देखील अतिक्रमण केलेले आहे. फक्त फाऊंडेशनच्या कार्यालयाची टपरी हटविण्याचे फर्मान देऊन टार्गेट करण्याचे काम केले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
एमआयडीसी मधील अधिकार्यांचे इतर अतिक्रमणधारकांशी आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांचे अतिक्रमण हटविण्यात येत नाही. अतिक्रमणाचा कायदा फक्त मागासवर्गीय व असंघटित कामगारांसाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट करुन एमआयडीसी नवनागापूर परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण हटवून, नोंदणीकृत हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.