शाश्वत उद्यासाठी स्त्री पुरुष समानता विषयावर व्याख्यान
महापालिकेतील चतुर्थ श्रेणी महिला कामगारांचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्रीच्या नारीत्वावर एक नारी आघात पोहचवीत असते. एक नारी दुसर्या नारीच्या जीवावर उठणार नाही, हा संकल्प महिला दिनी होणे आवश्यक आहे. यशस्वी स्त्रीच्या मागे समजूतदार पुरुष असतो. महिला पुरुष समानता निर्माण झाल्यास समाजासह देशाची प्रगती होणार असल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालय, न्यायाधार, अहमदनगर सेंट्रल व जिल्हा बार असोसिएशन, महिला समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेतील चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी शाश्वत उद्यासाठी स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी न्यायाधीश कंक बोलत होत्या. टिळकरोड येथील महापालिका श्रमिक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. के.एम. देशपांडे, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. संदीप वांढेकर, न्यायाधारच्या अध्यक्षा अॅड. निर्मला चौधरी, उपाध्यक्षा अॅड. विजया काकडे, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक सुषमा बिडवे, साखर कामगार संघटनेचे राज्य सहचिटणीस कॉ. आनंद वायकर, महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे, भरोसा सेलचे समुपदेशक शकुंतला लोखंडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायाधीश कंक म्हणाल्या की, पाश्चात्य देशात महिला पुरुषांना समान दर्जा आहे. मात्र आपल्या देशात हा दर्जा महिलांना मागून घ्यावा लागतो. यासाठी कायदे निर्माण करण्यात आले. स्त्री ही सक्षम असून, तिने तिच्या संरक्षण व चांगल्यासाठी मिळालेल्या कायद्याचा गैरवापर करणे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. तर ए नारी तू खुद को पहेचान, नारी होने कर अभिमान!… ही स्वरचित कविता सादर करून महिलांना प्रेरणादायी संदेश दिला.
प्रास्ताविकात अॅड. निर्मला चौधरी यांनी जागतिक पातळीवर शाश्वत स्त्री पुरुष समानता येणे आवश्यक आहे. महिलांवर अन्याय, अत्याचार, छळ, पिळवणूक सुरू असून ते दूर करण्यासाठी हा विषय घेण्यात आला. स्त्री पुरुष समानता राबविली गेल्यास कुटुंबव्यवस्था वाचणार आहे. संविधानाने स्त्री-पुरुष समानता दिली असून, शेवटच्या घटकांपर्यंत ही समानता पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. के.एम. देशपांडे म्हणाले की, स्त्री-पुरुषसाठी कायदे समान आहेत. स्त्री हक्काची जोपासना करण्यासाठी मुलीला वारसाहक्क जन्मापासून मिळाला आहे. मुलींमध्ये उपजतच कौशल्यपुर्ण क्षमता असतात. कुटुंब चालवणारी महिला बाहेरच्या क्षेत्राचेही उत्तम व्यवस्थापनाचे कार्य करू शकते. अनेक समस्या समर्थपणे पेलण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे. महिलांना दुय्यम दर्जा देणे ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. कोरोनाना महामारीत महिलांचे योगदान व महत्त्व अधोरेखित झाले आहे. महिलांनी कुटुंबासाठी दिलेले योगदान पुरुषांना या संकटकाळात कळले. सामर्थ्याने संकटांना तोंड देण्याची क्षमता महिलांमध्ये असते. अनेक कौटुंबिक वादात स्त्री ही स्त्रीची शत्रू ठरते. महिलेची तक्रार सासू, नणंद, भावजय याविरोधात असते. महिलांनी महिलांना आधार दिला पाहिजे. स्त्री-पुरुष समानता विचारातून व मनातून निर्माण झाल्यास बदल निश्चितच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. दीक्षा बनसोडे, सागर अनारसे, शबाना शेख, सुमन काळापहाड, गौतमी भिंगारदिवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. अनिता दिघे यांनी केले. आभार अॅड. शीतल बेद्रे यांनी मानले. कॉ. अनंत लोखंडे यांनी भाऊ-बहिणीच्या प्रेमावर आधारित कविता सादर करुन कार्यक्रमाची सांगता झाली.