जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करा
चर्मकार संघर्ष समितीची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने प्राथमिक शाळेची वेळ सकाळी 11:30 पर्यंत ठेवण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात व उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांना देण्यात आले. यावेळी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, राज्य संघटक नंदकुमार गायकवाड, राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे मेजर, युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात आदी उपस्थित होते.
शिक्षण विभागाने उन्हाळ्यात शाळेची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12:30 वाजे पर्यंत केली आहे. सध्या तापमान 41 अंशाच्या पुढे जात असताना मुलांना दुपारी 12 पर्यंत शाळेत ठेवणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. शिक्षण विभागाने शाळेच्या वेळेबाबत निर्णय घेताना लहान मुलांचा मानसिक, शारीरिक कोणताही विचार न करता अघोरी वेळ ठेवली आहे. अनेक शाळांचे वर्ग पत्र्याचे असून, यामध्ये मुलांना दुपारी 12:30 वाजे पर्यंत थांबणे देखील कठिण जात आहे. अनेकवेळा लाईट नसल्याने वर्गात थांबणे अशक्य असून, उन्हाळ्यात दुपारी साडेबारा पर्यंत मुलांना शिक्षण की शिक्षा? दिले जात असल्याचा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.
शाळेच्या चुकीच्या वेळामुळे पालकांचे पुर्णत: नियोजन कोलमडले आहे. शाळा सुटल्यावर मुलांना रणरणत्या उन्हातून घरी जावे लागत आहे. ग्रामीण भागात तर मुले अनवानी पायी डोक्यावर टोपी नसताना घरी जातात. अशा पध्दतीचे शिक्षण कुणासाठी व कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मुलांना या चुकीच्या वेळेमुळे त्रास होत आहे. मुलांचा अभ्यास अपूर्ण राहिला असला तरी मुलांचा जीव महत्त्वाचा असून, राहिलेला अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक सत्रात भरुन काढावा. ग्रामीण भागातील मुले दीड ते दोन किलोमीटर वरुन शाळेत येत असतात. तसेच त्यांचा पोषण आहार (खिचडी) सुध्दा बंद आहे. इतर जिल्ह्यामध्ये शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. शिक्षणाच्या नावाखाली मुलांना वेठीस धरणे योग्य नाही. शिक्षण विभागाने या प्रश्नाची व वास्तुस्थितीचे गांभीर्य ओळखण्याचे निवेदनात म्हंटले आहे. शिक्षण विभागाने सकाळी 7 ते 12:30 च्या वेळेत बदल करुन 11:30 पर्यंतच शाळा भरविण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. वेळेत बदल न झाल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.