शहरातील विडी कंपनीच्या स्थलांतरास व ठेकेदार पध्दतीला संघटनेचा विरोध
अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटना व लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ बालिकाश्रम रोड येथे निदर्शने करण्यात आली. तर शहरातील बागडपट्टी येथील ठाकुर सावदेकर या विडी उत्पादन करणार्या कंपनीने काम देण्याचे ठिकाण बदलून श्रमिकनगरला हलविण्यास व ठेकेदार पध्दतीला संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला.
शहरातील विडी कामगारांसाठी बागडपट्टी येथूनच विडी उत्पादनाचे काम पुर्ववत सुरु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कृवले यांना देण्यात आले. या आंदोलनात लाल बावटा विडी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, विडी कामागार युनियनच्या उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, कविता मच्चा, लक्ष्मी कोटा, कमलाबाई दोंता, शारदा बोगा, सगुना श्रीमल, रेखा मुनगेल, संगीता कोंडा आदींसह विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या किमती तीन वेळा पंधरा दिवसात वाढवल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे भाव सहा ते आठ रुपयांनी तर गॅसचे 30 ते 40 रुपयांनी वाढ करून महागाईचा आगडोंब उसळला आहे. सर्वसामान्य व्यक्ती या महागाईने त्रस्त झाली असून, जीवन जगणे देखील अवघड झाले असल्याचे म्हंटले आहे. तसेच शहरातील काही भागात सिग्नल नसल्याने वाहतुकीचे बट्ट्याबोळ व अवजड वाहनांना शहरात प्रवेश नसताना होणारे जीवघेणे अपघाताचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. तपोवन रोड येथे पाणी पुरवठा करणारी चाळीसगावची योजना वीज बिल न भरल्यामुळे बंद करण्यात आली असून, येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तपोवन रोड महापालिका हद्दीत असल्याने महानगरपालिकेत अमृत योजना फेज 2 मधून अथवा स्वतंत्र पाईपलाईन जोडून पाणी देण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील बागडपट्टी येथे असलेल्या ठाकूर सावदेकर विडी उत्पादन करणार्या कंपनीने 4 एप्रिलपासून कामाचे ठिकाण बदलून आठ किलोमीटर लांब असलेल्या श्रमिकनगर मध्ये हलविण्याचे ठरविले आहे. याठिकाणी ठेकेदारी पद्धत सुरू करण्यात येणार असून, याची विडी कामगार व संघटनेला कोणतीही पुर्वकल्पना देण्यात आलेली नाही. बागडपट्टी येथे दोनशे कायम कामगार तर लाल कार्डधारक निवृत्त कर्मचारी शंभरच्या आसपास आहेत. या कंपनीच्या श्रमिकनगर, शिवाजीनगर व नित्यसेवा सोसायटी येथे शाखा असून, येथे पान, तंबाखू वाटप तसेच तयार वीडी घेण्याचे काम चालते. कोणतेही निर्णय घेताना विडी कंपनीचे पुणे येथील मालक, मॅनेजर कधीही अहमदनगर शाखेत येऊन युनियन बरोबर अथवा कामगारांबरोबर चर्चा न करता चुकीच्या पध्दतीने निर्णय घेत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
कामगार कायद्यातील तरतुदीनुसार कामाचे ठिकाण व स्वरूप बदलताना युनियन व कामगारांना नोटीस देणे, पत्रव्यवहार या गोष्टी व्यवस्थापनाने केलेल्या नाहीत. बागडपट्टी परिसरात शहराच्या ठिकाणी राहत असलेले विडी कामागार पान व विडी घेण्यासाठी व बनवलेल्या विडी देण्यासाठी येतात. सदर कामाचे ठिकाण श्रमिकनगरला हलविण्यात आल्याने आठ किलोमीटर लांब जाणे-येणे विडी कामगारांना परवडणार नसून, बागडपट्टीत आहे त्या ठिकाणी पुर्ववत काम सुरु ठेवण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.