ऑर्किड प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी काढण्यात आली. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत निघालेल्या या चिमुकल्यांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभुषेत दिंडीत सहभागी झालेले चिमुकले दिंडीचे आकर्षण ठरले. या दिंडीच्या माध्यमातून झाडे लावा… झाडे जगवा या घोषणा देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाले होत्या. विणेकरी, चोपदार व दिंडी प्रमुखांच्या भूमिका बालकांनी पार पाडल्या. स्कूलच्या शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पार पडला.
संस्थेचे सचिव प्रवीण साळवे म्हणाले की, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती होणे आवश्यक आहे. याच भावनेतून इंग्रजीचे शिक्षण देत असताना आपल्या भारतीय संस्कृतीच्या संस्काराची रुजवण देखील विद्यार्थ्यांमध्ये केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षा शितल साळवे यांनी संस्कारापासून शिक्षणाकडे या ध्येयाने सुसंस्कारीत पिढी घडविण्याचे कार्य ऑर्किड प्री स्कूलमध्ये केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिक्षका शुभांगी अमोलिक, अमरिन सय्यद, शिरीन अग्रवाल, सफीरा शेख, सुनिता बोरडे, सुशिला आहिरे उपस्थित होत्या. आलमगीर परिसरातून या दिंडी सोहळ्याचे मार्गक्रमण झाले. शाळेच्या प्रांगणात या चिमुक्यांचा रिंगण सोहळा रंगला होता. प्रसाद वाटपाने दिंडीची सांगता झाली.