आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत मूत्रपिंड विकार तपासणी शिबीराला नागरिकांचा प्रतिसाद
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या जयंतीदिनाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य क्षेत्रात आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाव रुजवला. व्यावसायिकतेपेक्षा माणुसकी धर्माने दुबळ्या घटकातील रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्याचे कार्य अविरत सुरु आहे. कोरोना काळातही शहरवासियांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल मोठा आधार ठरला होता. आनंदऋषीजी महाराजांच्या विचार व दिशेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त श्रीमती बिजाबाई मोहनलाल रांका परिवाराच्या वतीने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत मूत्रपिंड विकार (एंडो- युरोलॉजिकल) तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे संभाजी कदम, युवा सेनेचे विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, जिवाजी लगड, शरद कोके, आयोजक संजय रांका, किरण रांका, चंद्रकांत रांका, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, संतोष बोथरा, शिबीराचे डॉक्टर संकेत काळपांडे, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मानवरुपी ईश्वरसेवेला अनेकांचे हातभार लागत असल्याने रुग्णसेवेचा वसा अविरत सुरु आहे. विविध शिबीरांचा समाजातील गरजू घटकांना लाभ होत आहे. बावीस वर्षात सर्वांच्या सहकार्याने व जैन सोशल फेडरेशनच्या योगदानाने ही सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली जात आहे. माजी आमदार स्व. अनिल राठोड यांनी हॉस्पिटलच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होते. त्यांनी हॉस्पिटलची अनेक कामे स्वत:ची समजून करुन दिली. हॉस्पिटलच्या उभारणीपासून त्यांचे नेहमीच सहकार्य राहिले. मनुष्यापेक्षा समाजकार्य मोठे असते, त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या जनसेवेद्वारे त्यांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
विक्रम राठोड यांनी आरोग्य सुविधांनी सुसज्ज आनंदऋषीजी हॉस्पिटल गोरगरीबांसाठी आधार असल्याचे सांगितले. संभाजी कदम यांनी आनंदऋषीजींच्या पावन भूमीत या हॉस्पिटलची मनुष्यरुपी सुरु असलेली ईश्वरसेवा अभिमानास्पद असल्याचे स्पष्ट केले. अभिषेक कळमकर म्हणाले की, रुग्णसेवेमुळे हॉस्पिटलने राज्यात नावलौकिक मिळवला आहे. सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करुन गोरगरिबांची सेवा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भगवान फुलसौंदर म्हणाले की, जगा आणि जगू द्या! या आनंदऋषींजींच्या विचाराने हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. स्वतःसाठी सर्व जगतात, मात्र इतरांसाठी जगणारे जीवनात अजरामर होत असतात. या भावनेने आनंदऋषीजी हॉस्पिटल गरजूंना आरोग्यसेवा देऊन नवजीवन देण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. संकेत काळपांडे यांनी मूत्रपिंड विकारावर (एंडो- युरोलॉजिकल) मार्गदर्शन करुन सर्वसामान्यांसाठी सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जात असून, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत लाभार्थींना शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. या शिबीरात 227 रुग्णांची मूत्रपिंड, स्टोन विकाराची (एंडो- युरोलॉजिकल) तपासणी करण्यात आली. आभार आशिष भंडारी यांनी मानले.