व्यक्तिमत्वाचा विकास साधून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात ध्येयप्राप्तीसाठी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी युवा अवस्थेपासून कठोर परिश्रम, सातत्य, चिकाटी, आत्मविश्वासाने नियोजन केल्यास जीवनात यशस्वी होता येते. कला-कौशल्याचे शिक्षण घेऊनही चांगले करिअर करता येते. फक्त नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योजक होऊन करिअर घडविता येत असल्याचे असे प्रतिपादन ह.भ.प. अॅड. सुनिल महाराज तोडकर यांनी केले.
बुरुडगाव रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) नेहरू युवा केंद्र, अहमदनगर जिल्हा निवडणूक शाखा, जय युवा अकॅडमी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संमेलन व करियर मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अॅड. तोडकर बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक वैद्यकीय तज्ञ डॉ. भास्कर रणनवरे, उपप्राचार्य विजय प्रभूणे, जय युवाचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, निवडणूक विभागाचे बाळासाहेब वाघ, विश्वास भिंगारदिवे, एनएसएसचे रवींद्र पवार, देविदास बडे, गटनिदेशक अरुण राऊत, पोपट नितनवरे, पोपट बनकर, आरती शिंदे, शरद वाघमारे, डॉ. धीरज ससाणे, जयेश शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. भास्कर रणवरे म्हणाले की, सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता राखल्यास कोरोना व इतर साथीच्या आजारांना देखील दूर ठेवता येते. कॉलरा, कावीळ आदी साथीच्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव अस्वच्छतेमुळे वाढतो. त्यामुळे आंतरिक व बाह्य स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य विजय प्रभुणे यांनी आजच्या युवा पिढीने राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र आदी शासनाच्या युवा विकासात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे. यामुळे युवकांच्या नेतृत्व विकास साधला जाणार आहे. भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे युवाशक्ती असून, युवकांनी विधायक कार्यात झोकून देण्याचे त्यांनी आवाहन केले.
आरती शिंदे म्हणाल्या की, मुलगा-मुलगी मध्ये भेद केला जातो. मुलगी आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून, मुलींना कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतल्यास सकारात्मक बदल होणार आहे. एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकते, कुटुंब शिकले तर गाव व शहर साक्षर होऊन देश सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुलींना समान संधी देण्याचे आवाहन केले. अॅड. महेश शिंदे यांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी कुशल प्रशिक्षण, आवडीच्या क्षेत्राची निवड, कष्ट करण्याची तयारी, काळानुरूप व्यवसायातील बदल, तांत्रिक कौशल्य, समाजाची गरज, गुणवत्तायुक्त उत्पादन व उत्कृष्ट संभाषणाचा समन्वय साधून आजच्या युवा पिढीने आपले कर्तुत्व दाखवून रोजगार देणारे होण्याचे आवाहन केले. जिल्हा निवडणूक शाखेचे बाळासाहेब वाघ यांनी एक मत अनमोल आहे. प्रत्येकाचे मत सुदृढ लोकशाहीसाठी महत्त्वाचे व बदल घडविणारे आहे. शंभर टक्के मतदान घडविण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेतला पाहिजे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी आधार कार्ड, पॅन कार्ड याप्रमाणेच मतदान कार्डला देखील महत्त्वाचे स्थान देऊन लोकशाही भक्कम करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मतदार जागृती, मुलगी वाचवा… मुलगी शिकवा, स्वच्छता अभियान, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. जिल्हा युवा संमेलनासाठी उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण रमेश गाडगे, आयटीआयचे प्राचार्य एस.डी. शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले. संमेलनासाठी जयेश शिंदे, स्वाती बनकर, दिनेश शिंदे, दर्शन बनकर आदींनी परिश्रम घेतले.