मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली येथील साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचा मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, आफताब शेख उपस्थित होते.
प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांनी कदमराव पदमराव या दखनीतील आद्य काव्य ग्रंथावरील समीक्षा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रसिद्ध केला. मराठी भाषेनं दखनी भाषेचा आधार घेऊन तिला समर्थ बनवून राष्ट्रभाषेच्या गौरवशाली शिखरावर कशा प्रकारे विराजमान केलं, याची प्रचिती हा ग्रंथ देत असून, या अख्यान काव्याच्या संशोधनाबद्दल त्यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाला आहे.
प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली येथील साहित्य अकादमीचा जाहीर झालेला भाषा सन्मान हे नगरच्या साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. जिल्ह्याचा मोठा साहित्य व सांस्कृतिक वारसा लाभला असून, आजम यांच्या भाषा सन्मानाने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मन्सूर शेख यांनी सांगितले.
प्रा. डॉ. आझम म्हणाले की, दखनीच्या पोटातून उर्दू भाषेचा जन्म झाला आहे. साधारण 300-350 वर्षांपूर्वी दखनी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असे. अहमदनगरसह इतर काही जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही दखनीच बोलली जाते. बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या निजामशाही आणि अन्य चार शाह्यांच्या काळात दखनी मोठ्या प्रमाणावर बोलली जात असे. या भाषेत विपुल साहित्यही निर्माण झालं. अनेक उत्तमोत्तम कवी झाले. दखनी जपण्यासाठी तिचा वापर वाढला पाहिजे. तिच्या संवर्धनासाठी विद्यापीठात अध्यासन निर्माण केलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रा. डॉ. आझम यांनी अहमदनगर महाविद्यालयात 34 वर्षे प्राध्यापक म्हणून हिंदी, उर्दू व पारशी या भाषेचे विभागप्रमुख म्हणून कार्य पाहिले आहे. ते दखनी भाषेच्या प्रचार-प्रसाराठी कार्य करत असून, पूर्वी ते झेंडीगेट भागात वास्तव्यास होते तर, सध्या मुकुंदनगर येथे वास्तव्यास आहे.