फेरचौकशीस हेतू पुरस्पर दिरंगाई केली असल्यास शिक्षा ठोठावण्याचे आदेश
शेवगावच्या स्वस्त धान्य दुकानदार कारवाई प्रकरणात झालेल्या फेरचौकशीच्या आदेशाचे अवमान केल्याचा ठपका
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शेवगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार कारवाई प्रकरणात दीड वर्षापुर्वी नाशिक पुरवठा विभागाचे उपायुक्त यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. तर या प्रकरणात आदेशाचे अवमान केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले असून, पुरवठा अधिकारी यांनी हेतू पुरस्पर दिरंगाई केली असल्यास शिक्षा ठोठावण्याचे आदेश नाशिक पुरवठा विभागाचे उपायुक्तांना दिले आहे.
शेवगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार देवीलाल बिहाणी (मयत) व प्रकाश गजभिव यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रद्द केला होता. त्याविरुद्ध बियाणी व गजभिव यांनी नाशिक पुरवठा विभागाचे उपायुक्त यांच्याकडे सदर निर्णयाविरोधात दाद मागितली होती. या दाव्यात तथ्य आढळल्याने बिहाणी प्रकरणात 28 ऑक्टोबर 2020 व गजभिव प्रकरणात 2 नोव्हेंबर 2020 रोजी नाशिक पुरवठा विभागाचे उपायुक्तांनी अर्जदाराचे अर्जातील युक्तीवादातील मुद्दे विचारात घेऊन त्यांच्या म्हणण्याकामी व पुराव्या देण्यात कामी वाजवी संधी देऊन, फेरचौकशी करून दोन महिन्यात फेरआदेश पारित करण्याचे आदेश निर्गमीत केले होते.
मात्र हा आदेश होऊन दीड वर्षे उलटून देखील फेरचौकशी करुन म्हणण्याकामी व पुराव्या देण्यात कामी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे बिहाणी व गजभिव मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या प्रकरणात 14 जून रोजी सुनावणी झाली. यामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी उपायुक्त नाशिक पुरवठा विभाग यांच्या आदेशाचे अवमान केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. पुरवठा अधिकारी यांनी हेतू पुरस्पर दिरंगाई केली असल्यास शिक्षेच्या आदेशाचे योग्य आदेश पारित करण्याचे निर्देश नाशिक पुरवठा विभागाचे उपयुक्तांना दिले आहे. या प्रकरणात बियाणी व गजभीव यांच्याकडून उच्च न्यायालयात अॅड. महेश काळे यांनी काम पाहिले, या कामात त्यांना अॅड. अतुल मुळे व अॅड. रत्नाकर मधाळे यांनी सहाय्य केले.