• Wed. Dec 11th, 2024

अहमदनगरचा मानवसेवा प्रकल्प ठरतोय रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी देवदूत

ByMirror

Sep 1, 2022

पश्‍चिमबंगालच्या हरवलेल्या सत्यमला साडे तीन वर्षांनी सापडले स्वत:चे घर

मनोरुग्णांवर उपचार करुन पुनर्वसनासाठी त्यांच्या कुटुंबाची शोधाशोध

अहमदनगर (प्रतिनिधी)- साडे तीन वर्षा पूर्वी पश्‍चिमबंगाल मधून हरवलेल्या सत्यम या मनोरुग्ण युवकाला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने आधार देऊन व उपचार करुन त्याचे कुटुंब शोधले. तर त्यांच्या कुटुंबीयांना शहरात बोलवून सदर युवकास त्यांच्या सुपुर्द केल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेक रस्त्यावरील मनोरुग्णांवर उपचार करुन त्यांच्या कुटुंबातच त्यांचे पुनर्वसन करुन मानव सेवा प्रकल्प देवदूतची भूमिका पार पाडत आहे.


एक 25 वर्षाचा युवक मानसिक अस्वस्थतेमुळे, मनावर मोठा ताण घेऊन वेगळ्याच विश्‍वात वावरतांना अरणगाव (मेहराबाद) येथील ग्रामस्थांना दिसला. अरणगाव येथील ज्ञानेश्‍वर पुंड यांनी या युवकाची माहिती देताच श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी धाव घेऊन रस्त्यावरील आयुष्य जगणार्‍या युवकाला 6 जुलै रोजी ताब्यात घेतले. संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. मानवसेवा प्रकल्पाने या युवकाला पोषक वातावरणात अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा पुरविल्या. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांनी या मनोरुग्ण युवकावर उपचार केले. उपचाराने सावरल्यानंतर संस्थेचे स्वयंसेवक प्रविण देशमुख, ईश्‍वर भोईर, मंगल गायकवाड व संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे यांनी समुपदेशन केले. समुपदेशनातून मिळालेल्या माहितीनुसार सत्यम हा युवक पश्‍चिमबंगाल मधील नारायणपूर (जि. बिरभूम) येथील असल्याचे समजले.


या युवकाने नाव गाव पत्ता सांगताच संस्थेचे स्वयंसेवक प्रविण देशमुख, अंबादास गुंजाळ यांनी पश्‍चिमबंगाल मधील बिरभूम पोलीसांशी संपर्क केला. मानसिक भान हरवलेल्या या तरुणाची त्याच्या कुटुंबाने पश्‍चिमबंगाल मधील मल्लारपुर पोलीस स्टेशन येथे 25 फेब्रुवारी 2019 रोजी सत्यम हरवल्याची नोंद केली. मल्लारपुर पोलीस व कुटुंबाने सत्यमचा शोध घेतला परंतु सत्यम सापडला नाही.


अखेर श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाच्या उपचार व समुपदेशनामुळे सत्यम या हरवलेल्या तरुणाचे कुटुंब शोधण्यास संस्थेच्या स्वयंसेवकांना यश आले. एकीकडे गणोशोत्सव घरी आनण्याची धामधुम सुरु असताना, दुसरीकडे मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक सण-उत्सव सोडून या युवकाला घरी पाठविण्यासाठी परिश्रम घेत होते. सदर युवकांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाल्यानंतर मंगळवारी (दि.30 ऑगस्ट) त्याचे वडील, चुलते, बहिण आणि पश्‍चिम बंगालचे पोलीस थेट अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात पोहचले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने कायदेशीर कारवाई करुन सत्यमला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.


हा युवक ताब्यात मिळताच सत्यमच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. संस्थेचे मार्गदर्शक प्रा. अविनाश मुंडके आणि स्वयंसेवकांनी सत्यम व त्यांच्या कुटुंबीयांना अहमदनगर रेल्वे स्टेशन पर्यंत सोडले. पश्‍चिम बंगाल पोलीस व सत्यमच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्ह्यातील मानवसेवा प्रकल्पाचे आभार मानले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक प्रा. अविनाश मुंडके, अरणगावचे मा. उपसरपंच महेश पवार, संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे हे उपस्थित होत्या. सत्यमला घरी पाठविण्यासाठी स्वयंसेवक सोमनाथ बर्डे, मथुरा जाधव, सुरेखा केदार, प्रियंका गायकवाड, राहुल साबळे, रवि मधे, मंगेश थोरात, प्रविण देशमुख, ईश्‍वर भोईर, मंगल गायकवाड, अंबादास गुंजाळ, सिराज शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *