प्रत्येक वैद्यकिय महाविद्यालयात ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जन पोस्ट असणे आवश्यक -डॉ. राजेंद्र भोसले
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत म्युकर मायकोसिसचा गंभीर धोका निर्माण झाला होता. मात्र दंतरोग तज्ञ, ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जन यांच्या मदतीने त्यावर मात करता आली. यामध्ये अनेक रुग्णांना जीवदान मिळाले. ग्रामीण भागात मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, दंत वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक वैद्यकिय महाविद्यालय देण्याबाबत शासनाचे धोरण आखले जात आहे. यामध्ये ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जनची एक पोस्ट असणे आवश्यक असून, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहे. इन्शुरन्स कंपनीने देखील ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल संबंधित शस्त्रक्रियाचा समावेश मेडिक्लेममध्ये केलेला नाही. राज्य व केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज येथे असोसिएशन ऑफ ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जन ऑफ इंडियाच्या तीन दिवसीय महाराष्ट्राची आठव्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.8 एप्रिल) जिल्हाधिकारी भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. गिरीशराव, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. प्रज्वलित केंडे, राज्य सचिव डॉ. विजय गिर्हे, डॉ. बी. सदानंदा, डॉ. अभिजीत दिवटे, डॉ. गोकुळ, ऑर्गनायझेशन चेअरमन डॉ. किरण खांदे, सायंटिफिक चेअरमन डॉ. हरिष सलूजा, ऑर्गनायझिंग सचिव डॉ. संजय असनानी, कॉन्फरन्स चेअरमन डॉ. नीलम अंधराळे, खजिनदार अभिषेक मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात ऑर्गनायझेशन चेअरमन डॉ. किरण खांदे यांनी कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर ही परिषद नगरमध्ये होत आहे. ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जरीबद्दल लहान शहरात जनजागृती व अद्यावत वैद्यकिय सुविधांची माहिती होण्यासाठी परिषद आयोजित केल्या जात आहे. या परिषदेत महाराष्ट्रातून तसेच आंध्रप्रदेश, जमशेदपुर, छत्तीसगड येथून तीनशेपेक्षा जास्त पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी व सर्जन सहभागी झाले असल्याचे सांगितले.
विजय गिर्हे यांनी मागील वर्षाचा वार्षिक अहवाल सादर करुन कोरोना काळात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. गिरीशराव यांनी ग्रामीण भागात अद्यावत वैद्यकिय ज्ञान व तंत्राचा प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे कौतुक करुन कोरोनाच्या दुसर्या लाटेत म्युकर मायकोसिसशी लढा देतानाचे अनुभव कथन केले.
प्रज्वलित केंडे म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जनचे काम अधिक व्यापक व आव्हानात्मक बनले आहे. नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञानाचा आत्मसात करुन डॉक्टरांनी म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना बरे केले. या प्रवाहात सर्व डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बी. सदानंदा यांनी कोरोना महामारीत डॉक्टरांनी सर्वसामान्य जनतेचा आत्मविश्वास वाढविला तसेच जगण्याची उमेद निर्माण केल्याचे स्पष्ट केले. यावेळी संघटनेच्या मागील वर्षाच्या कार्याचा व कार्यक्रमांचा अहवाल असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार डॉ. संजय असनानी यांनी मानले. राष्ट्रगीताने परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप झाला. या परिषदेसाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, सीएआय अकॅडमी, इटली अॅण्ड डिपार्टमेंट ऑफ ओरल अॅण्ड मैक्सिलोफेशियल सर्जरी, आरडीसी लोणी यांचे विशेष सहकार्य लाभले. परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. यशल जाधव, डॉ. कुणाल कोठारी, डॉ. अलका त्रिंबके, डॉ. कविता राणी, डॉ. योगीराज विरकर, डॉ. मोनल करकर, डॉ. अस्मिता लाड, डॉ. तन्वी संसगिरी परिश्रम घेतले.