सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी -मौलाना रियाज अहमद
अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड काळाची गरज बनली आहे. चंगळवादी पाश्चात्य संस्कृतीचे वारे वाहत असताना भावी पिढीच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. मुले कितीही उच्च शिक्षित झाली तरीही त्यांच्याकडे संस्कार व धर्माचे ज्ञान नसल्यास ते समाजासाठी निर्थक ठरणार असल्याचे प्रतिपादन मौलाना रियाज अहमद मजहरी यांनी केले.
नगर- औरंगाबाद महामार्गावरील कृष्णा इक्लेव्ह येथील अलकबिर वक्फ (मक्तब) मदरसाचा वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मौलाना रियाज बोलत होते. यावेळी हाफिज शब्बीर, अलिम हुंडेकरी, अब्दुस सलाम, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, बाबासहाब जहागीरदार, अल कबिर मक्तबचे सदस्य हनिफ बागवान, अकिल सर, साजिद शेख, शब्बीर भाई, रिजवान बागवान, आसिफ शेख, मोहंमद हुसेन, हबिब शेख, दानिश सय्यद, अदिल खान, अमिन पंजा, रेहान सय्यद, वाजिद मिर्झा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षक मौलाना ईस्माइल यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना कुरानचे व ईस्लाम धर्माचे ज्ञान देताना त्याचे महत्त्व व त्याचे जीवनात उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. लकबिर वक्फ (मक्तब) मागील सात वर्षापासून कार्यरत असून, धार्मिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांसह सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुरान पुर्ण करणार्या अकरा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकिल अहमद यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.