अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणचा इशारा
पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- अपहार उघडकीस येण्याच्या भितीने माहिती अधिकारात मागितलेली माहिती अडीच महिन्यापासून न देणार्या अहमदनगरचे समाज कल्याण अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे स्मरणपत्र अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिले. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत असणार्या सर्व संस्थांचे सन 1998 च्या शासन निर्णयाप्रमाणे संस्थांनी कर्मचार्यांचे पगार अदा केलेले ऑडिट फाईलची माहिती मागण्यात आली होती. सदरील शासन निर्णयाप्रमाणे पगार अदा न करणार्या संस्थेवर केलेली कारवाई व चौकशी अहवालाची माहिती मागितली होती. परंतु जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिशाभूल करण्यासाठी वारंवार संस्था चालकांना पत्रव्यवहार करून माहिती अधिकारातील माहिती अपीलात जाऊन सुद्धा माहिती दिलेली नाही. सदरची माहिती कार्यालयातील असून संस्था चालकांची अर्थपूर्ण संबंध असताना माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
ही माहिती 2 मे रोजी मागवण्यात आली होती. मात्र आजपर्यंत कुठलीही माहिती समाज कल्याण अधिकारी यांनी दिलेली नाही. पनवेल येथे माहिती अधिकारात माहिती न दिल्याने संबंधित अधिकारीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या धर्तीवर माहिती न देणार्या समाज कल्याण अधिकारी यांच्यावर भा.द.वि. कलम 166, 175, 176, 188, 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केली आहे.