आमदार जगताप यांच्या हस्ते प्रतीक भिंगारदिवे यांचा सत्कार
ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही. तर आलेल्या संकटावर मात करण्याचे बळ देखील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळत असते. प्रतीक भिंगारदिवे याने आपल्या वडिलांपुढे एक पाऊल पुढे टाकून मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करुन सहाय्यक फौजदाराचा मुलगा प्रतीक सुनील भिंगारदिवे याची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्त झाल्याबद्दल त्याचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक फौजदार सुनील भिंगारदिवे, राहुल जाधव, अय्याज सय्यद, गोविंद पाराशर, संतोष ढाकणे, मोहन गुंजाळ, स्मिता जाधव, शिवम डपकर, वैभव ढाकणे, गणेश बोरुडे निखील धोपटे, शुभम दुराई, मोना विधाते, निलेश बांगरे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप पुढे म्हणाले की, युवकांनी आपल्या क्षमता ओळखून त्या दिशेने वाटचाल करावी. विविध स्पर्धा स्वत: मधील क्षमता सिध्द करण्याची संधी देत असतात, युवकांनी ध्येय प्राप्तीसाठी कठोर मेहनत व जिद्दीने यश गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना प्रतीक भिंगारदिवे म्हणाले की, सातत्य, जिद्द व चिकाटी ठेवली तर यश मिळते. पोलीस दलाची पूर्वी पासून असलेली आवड व प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, ही वडिलांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपीएससी परीक्षेची तयारी करून उत्तीर्ण झालो. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सातत्य अभ्यासांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.