प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या व्याख्यानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वारी भक्ती मार्गाबरोबरच जीवन जगण्याचा संदेश देते -वृषाली पोंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सहसा घराबाहेर पडत नाही. मात्र महिलांनी वेळ काढून पंढरपूरची पायी वारी करावी. वारीसाठी कुटुंब एकत्र आल्यास एक वेगळी अनुभूती मिळू शकते. माऊलीची आस लागलेले भक्त आषाढीला पंढरपूरकडे ओढले जातात. वारी भक्ती मार्गाबरोबरच जीवन जगण्याचा संदेश देते. आपले जीवन हे देखील एक वारीच असल्याचे प्रतिपादन आकाशवाणीच्या निवेदिका वृषाली पोंदे यांनी केले.
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी आयोजित वारी आणि जीवन या विषयावर व्याख्यानात पोंदे बोलत होत्या. यावेळी विद्या बडवे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा वंदना गारुडकर, सविता गांधी, सचिव ज्योती कानडे, जयश्री पुरोहित, मेघना मुनोत, साधना भळगट, हिरा शहापुरे, उज्वला बोगावत, साधना भळगट, पूजा चव्हाण, शशिकला झरेकर, इंदू गोडसे, सुजाता पुजारी, उषा गुगळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे पोंदे म्हणाल्या की, वारीत आनंदी आनंदाचे वाटा मिळतात. उद्योजक, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक अनेक या वारीत एकत्र येतात. विचारांची देवाण-घेवाण होते. प्रवचन, कीर्तनातून संत साहित्याचा अभ्यास होतो. तर समाजप्रबोधनातून प्रश्नांची उकल होते. वारीतून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते, तर उच्च-नीच, पंथ हा भेदभाव नाहिसा होवून अहंकार गळून पडतो. लहान मोठ्यांकडून अनेक गोष्टी शिकण्यास भेटतात. वारी आनंदी जीवनाचा मार्ग दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात इंदू गोडसे यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.
मेघना मुनोत यांनी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मीनाक्षी कुलकर्णी, कल्पना कटारिया, अनिता गोयल, आशा कटारे, छाया शिंदे, पुष्पा मालू, अनुराधा फलटणे यांनी अनुक्रमे बक्षीसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बडवे यांनी केले. आभार वंदना गारुडकर यांनी मानले.