पर्यावरण संवर्धनाचा संदेश डोंगर परिसरात वृक्षरोपण
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वन संवर्धन दिवस वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावा जवळील डोंगर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.
दिपाली ठाणगे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष पै. अनिल डोंगरे, डॉ. विजय जाधव, भरत बोडखे, सोसायटीचे संचालक अजय ठाणगे, डॉ. केशव ठाणगे, गयाबाई ठाणगे, पै. पोपट शिंदे, कचरु कापसे, प्रमोद जाधव, गोरख फलके, पिंटू जाधव, भानुदास कापसे, दत्ता ठाणगे, ठकाराम शिंदे, सचिन जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, वाढत्या गरजा, अन्नधान्य, कारखाने, उत्पादने यांची वाढती लोकसंख्यानुसार मागणी तसेच अनाठायी गरजा भागविण्यासाठी निसर्गाच्या वनसंपत्तीला नष्ट करून त्या ठिकाणी मानव आपली वस्ती बसवत आहे. विकास गरजेचा असला तरी,वृक्षसंपदा त्यापेक्षाही महत्त्वाची आहे. निवासी वस्त्या नवीन कारखानदारी यासाठी अधिक जागेची पूर्तता वनसंपदा नष्ट करून तिथे माणूस फक्त आपले सुख, वैभव, स्वार्थ पाहत आहे. परंतु निसर्गावर घाला घालून आपण आपली हाऊस करताना निसर्गाचे नुकसान करुन स्वत: संकटाला आमंत्रण देत आहोत. त्याचे दुष्परिणाम मानवांना भोगावे लागत आहे. झाडांशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय प्राणी जीवन नसल्याचे त्यांनी सांगितले.

निमगाव वाघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी दिपाली प्रशांत ठाणगे व उपाध्यक्षपदी ललित काळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेत मुलांच्या सर्वांगीन विकास व गुणवत्तेसाठी सुरु असलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन यामध्ये आनखी सुधारणा करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट केले. या उपक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. फनीकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.