• Sat. Mar 15th, 2025

त्या मंदिर ट्रस्टचा गैरव्यवहार उघडकीस आनण्यासाठी दप्तर तपासणी करावी

ByMirror

Sep 17, 2022

सामाजिक कार्यकर्ते गोर्डे यांचे धर्मदाय उपायुक्तांना निवेदन

अकोले येथील मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिराचे मागील आठ वर्षात लेखापरीक्षणच झाले नसल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिर ट्रस्टच्या 2015 पासून झालेला गैरव्यवहार उघडकीस आनण्यासाठी सर्व दप्तर तपासणी करून विश्‍वस्तांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन धर्मदाय उपायुक्त उषा पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कारभारी गोर्डे यांनी दिले. मागील आठ वर्षापासून गैरव्यवहार उघडकीस येण्याच्या भितीने दोन्ही देवस्थानचे लेखापरीक्षण विश्‍वस्तांनी केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट प्रसिद्ध असून, देवस्थानचा दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या हरिनाम सप्ताहासाठी मंदिराकडे साधारण दीड लाख रुपयाची वर्गणी जमा होत असते. तर देवस्थानच्या मालकीची 13 एकर शेत जमीन लिलाव पद्धतीने कसण्यासाठी दिली जाते. सदर शेत जमिनीतून दरवर्षी किमान 50 हजार ते 1 लाख रुपये एवढ्या रकमेचा उत्पन्न मिळतो. सदरचा लिलाव हा विश्‍वस्त जाणीवपूर्वक त्यांच्या जवळच्या व्यक्तीस देतात व त्या ठिकाणी मिळणार्‍या उत्पन्नाचा गैरवापर आणि अपहार केला जात असल्याचा आरोप गोर्डे यांनी केला आहे.


देवस्थानच्या शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असून, सध्या कसण्यासाठी केवळ 4 ते 5 एकर जमीन उपलब्ध आहे. सदरचे झालेले अतिक्रमण हे विश्‍वस्तांच्या जवळच्या व्यक्तींनी केलेले असून, त्यांचे एकमेकांशी हितसंबंध असल्याने अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. तसेच संटूआई (जगदंबा) मातेचे मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. सदरचे मंदिर हे अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, बाळांचे जावळ काढण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दरमहा 150 ते 200 बालकांचे जावळ काढले जातात. जावळ काढण्यासाठी आलेले प्रत्येक भाविक हे देवस्थानासाठी देणगी देतात किंवा दानपेटी मध्ये पैसे टाकून जातात. तसेच वर्षभर येणारे भाविक भक्तांकडून मिळणारी देणगी अंदाजे 5 लाख रुपयांची रक्कम जमा होते. सदर मंदिराचे बांधकाम 2019 मध्ये पूर्ण झाले आहे. सदर बांधकामाची सुरुवात 2018 मध्ये केलेली होती. मंदिराचे बांधकाम सुरू होत्यावेळी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत वस्तू, बांधकाम साहित्य स्वरुपात केली होती. स्थानिक आमदारांनी देखील मंदिराच्या बांधकामासाठी भरीव मदत केलेली असून, मंदिर बांधकामासाठी अंदाजे 40 ते 60 लाख रुपये एवढी रक्कम देणगी स्वरूपात जमा झालेली आहे. सदरच्या मंदिरास भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करत असतात, यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


मंदिराला मोठ्या प्रमाणात आर्थिक देणगी मिळून देखील विश्‍वस्तांच्या सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे देवस्थानचा विकास खुंटला आहे. भाविकांकडून देवस्थानला मिळणारी रक्कम व खर्च याचा योग्य विनीयोग होण्यासाठी कायद्याप्रमाणे दरवर्षी अधिकृत लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. मात्र आज पर्यंत मंदिराच्या विश्‍वस्तांनी कोणत्याही वर्षी लेखापरीक्षण अहवाल, ऑडिट, रिपोर्ट तयार करून विहित वेळेमध्ये सार्वजनिक नोंदणी कार्यालयात दाखल केलेले नाही. मंदिराच्या विश्‍वस्तांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे तरतुदीचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. विश्‍वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन मंदिराच्या स्तरावर व जंगम मिळकतीचा उपभोग घेण्याचे काम विश्‍वस्त करीत आहे. मारुती मंदिर व सटूआई मंदिर ट्रस्टच्या 2015 पासून झालेला गैरव्यवहार उघडकीस आनण्यासाठी सर्व दप्तर तपासणी करून भ्रष्टाचार उघडकीस आनण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *