राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे ढवळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्हा शल्य चिकित्सक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृह, जनरल नर्सिंग व मिडिवायफरी (जी.एन.एम.) प्रशिक्षण भरती आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गोरगरीबांना जिल्हा रुग्णालयात त्रास सहन करावा लागत असून, यामध्ये सुधारणा न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांना काळे फासण्याचा इशारा ढवळे यांनी दिला आहे.

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात सामान्य परिचारिका वसतिगृहामधील विद्यार्थिनींना जाणून-बुजून त्रास देण्यात येत आहे. या मुली वसतिगृह सोडून गेल्यास त्यांच्या जागेवर आर्थिक घेवाण-देवाण करुन इतर मुलींना प्रवेश दिला जात आहे. तीन वर्षाचा कालावधी असलेल्या जनरल नर्सिंग व मिडिवायफरी (जी.एन.एम.) प्रशिक्षणाला खासगी संस्थेत पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो. शिवाय शासकीय प्रमाणपत्र देखील मिळत नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात चढाओढ सुरु असते. या वसतिगृहात त्रासाला कंटाळून किती मुली सोडून गेल्या याची चौकशी होण्याची गरज आहे. 29 डिसेंबर रोजी जनरल नर्सिंग व मिडिवायफरी (जी.एन.एम.) प्रशिक्षणासाठी दिपाली पवार या मुलीची जात प्रमाणपत्राच्या पावतीच्या आधारे निवड झाली होती. सदर मुलीला जात प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्याने तिला वेठीस धरण्यात आले.
याबाबत या मुलीने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता, जिल्हाधिकारी यांनी तातडीने संबंधित विभागाला जातप्रमाणपत्र मिळण्याबाबत सूचना केल्या. दिपाली पवार 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्रात गेली असता, प्राचार्य यांनी त्याची झालेली निवड जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रद्द केल्याचे आदेश संध्याकाळी 6 वाजता दिले. दुसर्या दिवशी या मुलीने विनंती अर्ज देण्याचा प्रयत्न केला मात्र, तो अर्ज घेण्यात आला नाही. 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांनी मुलीबरोबर जाऊन तो विनंती अर्ज दिला व त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळाले. या मुलीने 23 फेब्रुवारी रोजी आपले जात प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सादर केले. मात्र त्यांनी प्रतिक्षेत असलेल्या दुसर्या मुलीला तिच्या जागेवर प्रशिक्षणासाठी निवड केली व पात्र असलेल्या मुलीला घरचा रस्ता दाखविला आहे. या मुलीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सदर मुलीस व्हॅकन्सीवर घेण्याचे आदेश दिले. मात्र सदर मुलीचे विनंती व जिल्हाधिकारी यांच्या आदेशही फेटाळून अवमान करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येणार्या नागरिकांवर देखील जिल्हा रुणालयात अन्याय केला जात आहे. या कामातही अनागोंदी सुरु आहे. उपचारासाठी आलेल्या गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराच्या साखळी पध्दतीची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
जनरल नर्सिंग व मिडिवायफरी (जी.एन.एम.) प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास शासनाकडून पन्नास दिवस उशीर झाला. मात्र एका पात्र उमेदवाराने जात प्रमाणपत्र दाखल करण्यास दोन दिवस उशीर केल्याने तिची निवड रद्द करण्यात आली. हा एकप्रकारे अन्याय असून, या अनागोंदीची चौकशी होणे आवश्यक आहे. -बाळासाहेब ढवळे (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग)