• Wed. Oct 15th, 2025

काकणेवाडी व पोखरी येथे सामाजिक वनीकरणने लावलेली झाडे राहिली फक्त कागदोपत्री

ByMirror

Aug 2, 2023

वृक्ष लागवडीच्या निधीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागामार्फत काकणेवाडी व पोखरी (ता. पारनेर) येथे मागील वर्षी वृक्ष लागवडीच्या निधीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करुन जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.


खड्डे घेऊन, झाडे फक्त कागदोपत्री दाखविण्यात आले असल्याचा आरोप करुन सदर प्रकरणी येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


मांडवे खुर्द व पोखरी येथील सामाजिक वनीकरण विभागामार्फत गेल्या वर्षी वृक्ष लागवड करण्यात आली होती. परंतु तेथील सामाजिक वनीकरणाचे अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे झाडे तेथे जिवंतच राहिली नाही. त्या भागात अधिकाऱ्यांनी संगणमत करून फक्त खड्डे घेतले व खड्ड्यांची संख्या कागदोपत्री जास्त दाखवून संगणमताने बिले काढली. उन्हाळ्यामध्ये झाडांसाठी टँकरद्वारे पाणी देण्याच्या कामाचेही फक्त कागदावर दाखवून त्याचीही बिले काढण्यात आली असून, प्रत्यक्षात झाडे नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.


या प्रकरणात झाडे जिवंत नसताना देखील मोठ्या प्रमाणात शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला आहे. काकणेवाडी व पोखरी येथे सामाजिक वनीकरणाच्या वृक्ष लागवडीसाठी झालेला खर्च आणि स्थळाची पहाणी करून स्वतंत्र विभागामार्फत चौकशी व्हावी व दोषी असणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *