शहरात नगर-कीर्तन उत्साहात
ढोल-ताशांच्या निनादात, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल! च्या जयघोषाने दुमदुमले शहर
नगर (प्रतिनिधी)- गुरु तेग बहादुरजी यांची शहिदी आणि श्री गुरु गोबिंदसिंग यांच्या गुरुतागद्दीच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात आलेल्या भव्य नगर-कीर्तनाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा व समूह नानक नाम लेवा संगत अहिल्यानगर यांच्या वतीने या जथाचे स्वागत करुन डिएसपी चौकातून गुरुद्वारा गोविंदपुरा पर्यंत नगर-कीर्तनाची रॅली काढण्यात आली.

ढोल पथकाच्या निनादात आणि जो बोले सो निहाल, सत श्री अकाल! या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नगर-कीर्तनात गुरुग्रंथ साहेबांसह शीख गुरू व साहेबजाद्यांच्या शस्त्रांचा समावेश असलेला भव्य रथ होता. मिरवणुकीच्या अग्रभागी पंचप्यारे चालत होते. फुलांच्या वर्षावात पार पडलेल्या या सोहळ्यात शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या नगर-कीर्तनात मुखी शिरोमणी पंथ अकाली बुढ़ा दलचे (पंजवा तख्त) प्रमुख बाबा बलबीरसिंग 96 करोडी, बाबा कन्हैय्याजी, बाबा रणजीतसिंह (मनमाड), जयमलसिंह धिल्लो (नांदेड) व सुखदेवसिंह (दमदमा साहेब) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. गुरुद्वारा भाई दया सिंगजी येथे अध्यक्ष बलदेवसिंग वाही यांनी नगर-कीर्तनाचे स्वागत केले. यावेळी आमदार संग्राम जगताप, खासदार निलेश लंके, माजी नगरसेवक संभाजी कदम, ब्रिगेडियर चावला, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, योगीराज गाडे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
गुरुद्वारा येथे गुरु हरगोविंद साहेबांची कटार, श्री गुरु गोबिंदसिंगजी यांची तलवार (कृपान), बाबा फतेहसिंह यांची ढाल व बाबा दीपसिंहजींची दुमाला (पगडी) चक्राचे भाविकांना दर्शन घडविण्यात आले. भक्तांनी मनोभावे या ऐतिहासिक शस्त्रांचे दर्शन घेतले. बाबा बलबीरसिंग 96 करोडी व बाबा कन्हैय्याजी यांनी गुरुद्वाऱ्यात भाविकांशी संवाद साधत ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला.
दमदमा साहेब, पंजाब येथून निघालेल्या या नगर-कीर्तनाच्या माध्यमातून गुरुसाहेबांचे शस्त्र देशभरातील भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. यामुळे शीख समाजाचा इतिहास व त्यांनी धर्मासाठी दिलेले बलिदानाच्या घटनांना उजाळा दिला जात आहे. नुकतेच हे नगर-कीर्तन पुणे येथून अहिल्यानगरमध्ये दाखल झाले होते. संध्याकाळी ते छत्रपती संभाजीनगरकडे मार्गस्थ झाले. नगर-कीर्तन यात्रेला सहकार्य केल्याबद्दल पोलीस व जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुद्वारा भाई दया सिंगजी येथील सर्व सेवादारांनी अध्यक्ष बलदेवसिंग वाही यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता गुरुद्वाऱ्यातील लंगराने झाली.
