धनादेश न वाटल्या प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड
नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याच्या प्रकरणात शहरातील फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीस दोन महिन्यांचा साधा कारावास आणि तब्बल 13 लाख 20 हजार रुपयांची नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणात आरोपीने उधारीवरील रक्कम फेडण्यासाठी दिलेला चेक वटला नसल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
फिर्यादी साईराज फ्रुट कंपनीचे मालक संतोष प्रभू ढवळे यांनी आरोपी इरफान बाबासाहेब बागवान (रा. सागर कॉम्प्लेक्स स्टेशन रोड) यांचा मार्केटयार्ड येथे होलसेल फळ विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी इरफान बागवान यांचा देखील किरकोळ फळ विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी या फिर्यादी कडून उधारीने माल खरेदी करत होता. उधारीची रक्कम रोख अगर चेकने फिर्यादीकडे जमा करीत होता. सदर व्यवहारातून आरोपीकडे 8 लाख 80 हजार उधारी झाल्याने फिर्यादी आरोपीकडे उधारीची मागणी केली असता आरोपीने फिर्यादीला आरोपीचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा केडगाव बँकेचा 3 जानेवारी 2017 रोजी चा रक्कम 8 लाख 80 हजारचा धनादेश दिला होता.
सदरचा चेक निश्चित वटेल अशी खात्री व भरवसा आरोपीने फिर्यादीला दिला होता. फिर्यादी यांनी सदरचा चेक त्यांचे खाते असलेल्या कोटक महिंद्रा बँक शाखेत भरला असता सदर चेक 21 फेब्रुवारी 2017 रोजी खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने न वाटता परत आला.
यामुळे फिर्यादी यांनी ॲड. राजेश दत्तात्रय कावरे यांच्यामार्फत अहमदनगर येथील चीफ ज्युडीशीअल मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट चे कलम 138 अन्वये फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीचे गुणदोषावर चौकशी होऊन आरोपीस धनादेश न वटल्याप्रकरणी चीफ ज्युडीशीअल मॅजिस्ट्रेट (कोर्ट नंबर 4) पैठणकर यांनी 2 महिने कारावासाची शिक्षा व 13 लाख 20 हजार दंडाची रक्कम फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश केला आहे. सदर प्रकरणात फिर्यादी यांच्या वतीने ॲड. राजेश कावरे यांनी बाजू मांडली.