मानवी हक्क जागृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश
निरोगी पर्यावरण हा माणसाचा मूलभूत हक्क -अशोक भोसले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क अभियानतर्फे अहिल्यानगर, सावेडी येथील दिनुभाऊ कुलकर्णी शारीरिक शिक्षण व क्रिडा मैदान (जॉगिंग पार्क) परिसरात वृक्षारोपण राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करुन समाजात मानवी हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मानवी हक्क अभियानाचे शहरजिल्हाध्यक्ष अशोक भोसले व भाजपाचे कार्यकर्ते सुनिल सकट यांच्या हस्ते आंब्याच्या रोपाची लागवड करण्यात आली. हिरवाईची परंपरा जपण्यासाठी व पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ-निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण हा महत्त्वाचा मार्ग असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाला रामभाऊ पेटारे, अमर भोसले, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संजय शिंदे, पिनू भोसले, लखन साळवे, संतोष शिरसाठ, पोपट भोसले यांसह मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरजिल्हाध्यक्ष अशोक भोसले म्हणाले की, “मानवी हक्क संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे एकमेकांशी निगडित विषय आहेत. सुरक्षित, स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. हा हक्क टिकवण्यासाठी समाजाने सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनिल सकट म्हणाले की, जागतिक मानवी हक्क दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, समाजाला संवेदनशील करण्याचा आणि माणुसकीचा संदेश देण्याचा दिवस आहे. मानवी हक्क म्हणजे केवळ कायदे न राहता प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळणे हा त्याचा खरा अर्थ असल्याचे स्पष्ट केले. मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
