श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व सुपा पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई; आरोपीस अटक
वेठबिगारी विरोधात समाजाने एकत्र यावे – दिलीप गुंजाळ
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील हंगा गावात मानवी तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांना ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
25 एप्रिल रोजी मध्यरात्री श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ, जिल्हा समन्वयक सिराज शेख व मंगेश थोरात यांनी हंगा गावात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी वेठबिगारीच्या गुलामगिरीत अडकलेल्या तीन युवकांची माहिती मिळवली. प्रकाश साळुंके या व्यक्तीने अहिल्यानगर रेल्वेस्थानक परिसरातून दुर्बल, परावलंबी व असंघटित अशा तीन युवकांना फसवून पळवून नेले होते आणि त्यांच्याकडून घरकाम, लोहारकाम, घोडे सांभाळणे व शेण उचलण्याचे काम बळजबरीने करून घेत होते.
या युवकांना कोणताही मोबदला न देता, काम न केल्यास त्यांना शिवीगाळ व मारहाण केली जात होती. युवकांच्या पाठीवर झालेल्या मारहाणीच्या जखमा पाहून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिराज शेख यांनी तातडीने सुपा पोलीस स्टेशनला संपर्क साधला. सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पो. कॉ. विकास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी तत्काळ कारवाई करत युवकांची सुटका केली.
सुटका केलेल्या युवकांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून, त्यांचे संरक्षण व पुनर्वसनाकरिता त्यांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले आहे. यावेळी आरोपी प्रकाश साळुंके याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) 2023 चे कलम 115, 351(2), 352, 127(2) आणि बंदबिगार पद्धती अधिनियम 1976 अंतर्गत कलम 16 व 18 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ, सिराज शेख, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयुरी वनवे, ऋतिक बर्डे तसेच आंतरराष्ट्रीय न्याय मिशन (आयजेएम) च्या लिला नंदा व गोरख जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली.
वेठबिगारी ही समाजासाठी घातक समस्या असून, तिचा संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेठबिगारी विरोधात समाजाने एकत्र आल्यास हा प्रश्न सुटणार आहे. मानवमूल्यांची जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. -दिलीप गुंजाळ (संस्थापक, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ)