आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीचा उपक्रम
ग्रंथ दिंडीतून मराठीचा जागर; विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा पुरस्काराने गौरव
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक व कवी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी गावातून विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांसह ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीतून मराठी भाषेचा जयघोष करण्यात आला. परिवार मंगल कार्यालयात साहित्यिक गुंफाताई कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, कवी संमेलनाच्या अध्यक्षा मनिषा गायकवाड, कवियत्री सरोज अल्हाट, संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी आनंदा साळवे, संभाजी नगर जिल्हा परिषदचे माजी सभापती मारुती साळवे, दिलावर शेख, साहेबराव बोडखे, भाऊसाहेब ठाणगे, भागचंद जाधव, अतुल फलके, ॲड. शुभम साके, ॲड. ऐश्वर्या काळे, चंद्रकांत पवार, गोरख चौरे, सागर कापसे, ज्ञानदेव कापसे, रामदास पवार, समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले, पिंटू जाधव आदींसह कवी, साहित्यिक, ग्रामस्थ व साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. पाहुण्यांच्या हस्ते निमगाव वाघात उभारण्यात येत असलेल्या पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. शालेय विद्यार्थी व कवींनी विठ्ठल-रुक्मिणी, शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यावर कविता सादर केल्या. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार, वारकरी भूषण, राजश्री शाहू महाराज समाजभूषण, समजारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सकाळच्या सत्रापासूनच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने रंगली होती. काव्य संमेलनात ज्येष्ठ आणि नवोदित कवींच्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली. विविध सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण आणि राष्ट्रीय विषयांवर सादर करण्यात आलेल्या कवितांना भरभरून प्रतिसाद मिळाला. कवी गोकुळ गायकवाड, ह.भ.प. निवृत्ती महाराज कानवडे, जयश्री सोनवणे, बाळासाहेब मुन्तोडे, गौतम वाघमारे, हेमलता गीते आदी कवींनी काव्य संमेलनात सहभाग नोंदवला. कु. ओवी काळे व कु. दीक्षा घोडके आणि ह.भ.प. सोमनाथ महाराज बारगळ यांनी पोवाडे गायीले.
गुंफाताई कोकाटे म्हणाल्या की, मराठी साहित्याला समृद्ध संतांची परंपरा आहे. मराठी ग्रामीण साहित्याची परंपरा महात्मा फुले यांनी सुरू केली. महिला आज सक्षम झालेल्या असून, त्याच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. संरक्षणाची लढाई लढत असताना महिलांना खूप त्रास होत आहे. सर्व भावांची साथ लाभल्यास महिला संरक्षणाचा लढा यशस्वी होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
साहित्य समानतेची शिकवण देते. साहित्यच्या वाचनातून माणुस घडतो. जातिवाद, धर्मवाद व लिंगभेद नष्ट करण्यासाठी साहित्य चळवळ प्रभावी करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲड. सुरेश लगड म्हणाले की, समाजाचे प्रतिबिंब साहित्यातून उतरत असते. तर साहित्याने क्रांती झाल्याचा इतिहास आहे. समाजाला चांगल्या पध्दतीने पुढे घेऊन जाण्यासाठी या चळवळीला बळ द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी ग्रामीण भागात सातत्याने सुरु असलेल्या साहित्य चळवळीबद्दल संस्थेचे कौतुक केले. प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागातील साहित्य व काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद दारकुंडे यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.