माहूर गडावरील रेणुका मातेच्या प्रतिकृतीची स्थापना; देवीला 5 किलो चांदीचा मुकुट अर्पण
पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती
नगर (प्रतिनिधी)- नगर एमआयडीसी, नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात माहूर गडावरील रेणुका मातेची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. धार्मिक व उत्साहापूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने बसविण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीला 5 किलो चांदीचा आकर्षक मुकुट अर्पण करण्यात आला.
विधीवत मंत्रोच्चार, हवन, जाप व विविध धार्मिक विधींनी संपूर्ण मंदिर परिसराचे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्यानंतर शशिकांत गुप्ता, सौ. नीलम गुप्ता व अविनाश कांडेकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. तसेच यावेळी भगवान परशुराम यांच्या मुर्तीची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.
माहूर गडावरील रेणुका माताची प्रतिकृती असलेली ही मूर्ती अत्यंत आकर्षक स्वरूपात साकारण्यात आली असून, तिच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मूर्तीचे देखणे रूप, त्यावरील अलंकार आणि 5 किलो चांदीचा मुकुट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मंदिर परिसरात भाविकांचा ओघ दिवसभर सुरूच होता.
सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे श्री रेणुका माता देवस्थान परिसर भक्तिभावाने फुलला होता.