शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण; काव्य-शाहिरीतून समाजप्रबोधनाचा जागर
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील ज्येष्ठ व नवोदित साहित्यिक, कवी, शाहिर, कथाकथनकार यांच्या विचारांची समृद्ध मैफल या संमेलनात रंगली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर युवक-युवतींनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली. शिवकालीन युद्धकलेचा थरार यावेळी रंगला होता.
साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार, एकोप्याचा संदेश देत या संमेलनाने ग्रामीण भागात वैचारिक चळवळीचा जागर घडवला. शाहिरी पोवाडे, काव्यवाचन आणि सामाजिक आशयाच्या सादरीकरणातून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आदी विषय प्रभावीपणे मांडण्यात आले. हे संमेलन ‘मेरा युवा भारत’, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाचे उद्घाटन सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून झाले. ॲड. भूषण बऱ्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर, कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, सारिका अंधारे, मनिषा चव्हाण, शकुंतला काळे, अर्चना काळे, संदिपकुमार बोरकर, कवी आनंदा साळवे, कवी सुभाष सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, “ग्रामीण भागात साहित्याची गंगा पोहोचावी, युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि समाजात सकारात्मक विचारांची बीजे पेरली जावीत, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि संत गाडगे महाराजांचे समाजसेवेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाले की, शिवरायांचा इतिहास केवळ पराक्रमाचा नाही, तर शिस्त, संघटन आणि स्त्रीसन्मानाचा आहे. युवकांनी मर्दानी खेळांबरोबरच समाजातील जबाबदाऱ्या ओळखून आदर्श नागरिक म्हणून पुढे यावे. साहित्य आणि संस्कृती ही समाजघडणीची प्रभावी साधने आहेत. अशा उपक्रमांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषण ॲड. भूषण बऱ्हाटे म्हणाले की, ग्रामीण साहित्य संमेलन ही केवळ काव्याची मैफल नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. शाहिरी, पोवाडे आणि काव्य यांच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले गेले पाहिजेत. शिवरायांच्या विचारांमधील स्वराज्य, न्याय आणि समानतेची तत्त्वे आजही तितकीच प्रेरणादायी आहेत. युवकांनी साहित्याच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्याचा संकल्प करण्याचे त्यांनी आवाहन केले.
कवी संमेलन बाळासाहेब मुन्तोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कु. ओवी प्रसाद काळे हिने शिवरायांच्या पराक्रमावर प्रभावी पोवाडा सादर केला. रमेश चव्हाण (शिरुर) यांनी ‘पुन्हा जन्मावे शिवाजी महाराज’ हे गीत सादर केले. बबनराव आढाव (चिंचोळे) यांनी धनगर समाजातील व्यथा मांडणारे काव्य सादर केले. उमेश गोरे यांनी शिवजन्मावर पोवाडा, तर संदिप रासकर यांनी शीघ्र कविता सादर करून सभागृह दुमदुमून टाकले.
या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष तसेच ग्रंथालय विभाग (महाराष्ट्र) संचालक अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप रासकर यांनी केले.
—–
विविध पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान
संमेलनात ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण’, ‘गुणवंत प्राध्यापक’ तसेच ‘छबूबाई नगरकर लोककलावंत’ पुरस्कार प्रदान.
चंद्रकांत पालवे, प्रा. मेधाताई काळे, सरोज आल्हाट, राजेंद्र घोडके, भाऊसाहेब कदम, संदिप रासकर, गवाजी बळिद, आशा क्षीरसागर, सुनंदा बडे, जयश्री नवले, डॉ. अस्मिता खिस्ती, सुरेश चव्हाण, मनोज शिंदे, मेजर धनेश्वर भोस, शुभम खामकर, महेश कुलकर्णी, विवेक शेलार, स्वप्निल पवार, वसंत खेमनर, अशोक भालके, ओवी काळे, शिवाजी थिटे आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
–
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….
