एजंटांना हाताशी धरुन आर्थिक हित साधत असल्याचा आरोप
ओरडून बोलणे, दमदाटी व उडवाउडवीचे उत्तरे देऊन सर्वसामान्य जनतेची अडवणुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना सेवा न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन त्रास देणाऱ्या अन्नधान्य वितरण कार्यालयातील त्या मुजोर महिला कर्मचारीची बदली करण्याची मागणी मानवता हाच एक धर्म संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर महिला एजंट लोकांना हाताशी धरुन आर्थिक हित साधत असल्याचा आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
या महिलेची तक्रार संस्थेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संस्थेचे शहराध्यक्ष उमंग ठाकरे, नाजीम कुरेशी, मुकेश कांबळे, वसीम पटेल, अर्जुन बडेकर, मुजीर सय्यद आदी उपस्थित होते.
शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील अन्नधान्य वितरण कार्यालयात नियुक्त असलेली ती महिला सरकारी काम करण्यासाठी मलिदा लाटण्याचे काम करत आहे. रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे, कमी करणे, दुबार रेशन कार्ड आधी कामे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर झाले असून, एजंटशिवाय कामे होत नाही. नागरिक काही कामे घेऊन आल्यास त्यांना दिशाभूल करणारी माहिती देऊन घरचा रस्ता दाखविला जात आहे. तर सर्वसामान्य माणसांना ओरडून बोलणे, दमदाटी करणे व उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रकार सुरु आहे. या महिलेच्या नियंत्रणाखाली पाच ते सात एजंट काम करत असून, मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
त्या महिलेची सर्व देवाण-घेवाण एका महिला अधिकारीच्या मर्जीप्रमाणे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभाराने सर्वसामान्य जनतेची अडवणुक व पिळवणुक होत असताना त्रासदायक ठरणाऱ्या त्या महिला कर्मचारीची बदली करण्याची मागणी मानवता हाच एक धर्म संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
