पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार
भावनात्मक गुलामी झुगारण्यासाठी नवी सामाजिक-राजकीय संकल्पना -ॲड. गवळी
नगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वराज्य अद्यापही सर्वसामान्यांना मिळाले नसल्याने लोकमकत्यागिरीच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने द्वितीय स्वराज्य ही नवी संकल्पना मांडण्यात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून एक चेतनाशील, नैतिक आणि समताधिष्ठित व्यवस्था उभारण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
ब्रिटिश सत्तेपासून भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण खऱ्या अर्थाने स्वराज्य अद्यापही सर्वसामान्य भारतीयांच्या दारात पोहोचलेलं नाही. केवळ मतदानयंत्रणेला लोकशाही मानणारी मानसिकता, आणि भावनिक राजकारणावर उभे राहिलेले सत्ताधारी, हीच लोकमकत्यागिरी आजच्या लोकशाही व्यवस्थेची सर्वात मोठी अडचण ठरली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, द्वितीय स्वराज्य ही नवी संकल्पना संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
लोकमकत्यागिरी ही फक्त राजकीय युक्ती नसून एक सामाजिक-मानसिक अधोगती आहे. जातीयता, धार्मिक ध्रुवीकरण, सूड, क्रोध, अंधश्रद्धा या भावना मतदार व नेते यांना संकुचित करतात. त्यामुळे, नागरिक समूहहिताऐवजी स्वहिताकडे झुकतात, भ्रष्टाचारी सत्ताधारी निवडून येतात, सामाजिक विषमता टिकून राहते. हक्कांची पायमल्ली होऊन जातीय हिंसा, पोलिसी अत्याचार भूमिहीनता हे वास्तव कायम आहे. वंचितांवर न्यायालयीन अन्याय सुरु असून, 5 कोटी प्रलंबित खटले, आणि गरीबांसाठी न्याय अद्याप स्वप्नवत आहे. दलित, आदिवासी, महिला अजूनही न्यायापासून दूर आहेत. निवडणुकांमध्ये जात, धर्म, इतिहास या आधारांवर लोकांची मने ढवळली जातात. लोकभानाऐवजी अंधभक्तीला खतपाणी घातले जाते. अनेक निर्णय कॉर्पोरेटांच्या फायद्यासाठी घेतले जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
द्वितीय स्वराज्य ही नवी संकल्पना विज्ञान, अनुभव, भावना, तत्वज्ञान व नैतिकतेच्या समन्वयावर आधारित आहे. सूक्ष्म चेतना हा त्याचा केंद्रबिंदू असून, जी नागरिकाच्या निवडीवर प्रभाव टाकते. जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स् चे अधिकार द्यावे, (अनुच्छेद 32(3)) गरिबांना थेट दिल्लीपर्यंत सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागू नये. मूलभूत हक्कांचे संरक्षण स्थानिक पातळीवरच मिळाले पाहिजे.
लोकभज्ञाक शाही ही नवी राजकीय रचना असून, यामध्ये जनसेवा करणारा उमेदवार (लोकभक्ती), नीतिमत्ता व समाजदृष्टी असलेला नेता (ज्ञानभक्ती) आणि निःस्वार्थ व पारदर्शक कृती करणारा कार्यकर्ता (कर्मभक्ती) यांना निवडून देण्याचे म्हंटले आहे. उमेदवारीसाठी समाजकार्य अनुभव, प्रामाणिकतेचा अहवाल, स्थानिक जनमान्यतेचे मोजमाप आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.
नागरिक नियंत्रक मंडळे स्थापन झाली पाहिजे. प्रत्येक तालुक्यात योजनांवर देखरेख, निधीचा विनियोग, भ्रष्टाचारावर नजर, माहितीचा अधिकार व पारदर्शकता वाढवणे. तसेच पर्यावरणीय स्वराज्याची पायरी मजबूत करण्यासाठी रेन गेन बॅटरीद्वारे पावसाचे पाणी जमिनीत साठवून पाणी स्वावलंबन साधणे. जीवनाचा हक्क (अनुच्छेद 21) व पर्यावरण रक्षण (अनुच्छेद 48) या अंतर्गत रेन गेन बॅटरी ही संविधानात मान्यता पावली पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
द्वितीय स्वराज्य ही केवळ सत्तांतराची नाही तर मूल्यांतराची क्रांती आहे. जिथे तत्त्वज्ञान, लोकभज्ञाक शाहीची रचना आणि सूक्ष्म चेतनेचे पुनरुत्थान यांच्याद्वारे भावनात्मक गुलामीचे उच्चाटन केले जाईल. भावनात्मक गुलामी झुगारण्यासाठी नवी सामाजिक-राजकीय संकल्पना आवश्यक आहे. द्वितीय स्वराज्य हेच खरे स्वराज्य आहे, जे जनतेच्या मना-मनात जागृत होणार आहे. -ॲड. कारभारी गवळी