विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण
शालेय जीवन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचतो -हरजितसिंह वधवा
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालया व प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. दातरंगे मळा येथील श्री मार्कंडेय संकुलात शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, श्रीकांत छिंदम, विश्वस्त शंकर सामलेटी, राजूशेठ म्याना, स्नेहाताई छिंदम, शिवसेनेचे शहर उपप्रमुख संदीप दातरंगे आदी उपस्थित होते.

हरजितसिंह वधवा म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. संस्कार व शिक्षणाची जडणघडण होत असते. गरुडाची गोष्ट सांगून त्यांनी जीवनातील अपयश पचवून पुन्हा भरारी घेण्याचे आवाहन केले. श्रीकांत छिंदम यांनी विद्यालयास पुन्हा एकदा उर्जित अवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. शाळेत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. शाळा पुन्हा उंच भरारी घेणार असल्याचे स्पष्ट करुन श्री मार्कंडेय संकुल दातरंगे मळा येथे प्राथमिक विभाग सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, शाळेच्या सर्वांगीन प्रगतीसाठी सर्व संस्थाचालक प्रयत्नशील आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शालेय शिक्षक देखील योगदान देत आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी या शाळेतून घडले असून, पुन्हा मार्कंडेय शाळा प्रगतीपथावर असणार असल्याचे स्पष्ट करुन विद्यालयात कॉमर्स आणि सायन्स विभाग सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिंदम यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा व गुणवत्तेचा लेखाजोखा मांडून उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय शालिनी गोसकी यांनी करून दिला. विद्यालयाचा अहवाल वाचन ज्येष्ठ विश्वस्त शंकर सामलेटी यांनी केले. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान हा विषय घेऊन विद्यालयातील पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, अध्यापक सतीश बोडके, सुकन्या बोल्ली, मयुरी लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळांतर्गत विविध परीक्षां व स्पर्धापरीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, जयश्री मेहेर, मंजुश्री धाडगे,कल्याणी म्याना, ग्रंथपाल विष्णू रंगा आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारितोषिक वितरणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता.
यामध्ये विद्यालयातील ढोल पथकाने सुरूवात करून विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका खरदास, अर्चना साळुंके, ज्योती कवाष्टे, शोभा बडगू यांनी केले. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल यांनी आभार मानले. कल्यानी म्याना यांनी शेवटी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.