पुस्तकातील थॅलेसेमिया रुग्णांचा संघर्ष इतरांसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरणार -तानाजी सावंत
लेखक ॲड. सय्यद यांनी मांडला थॅलेसेमिया जागृती व मुक्तीचा लेखाजोखा
अहमदनगर (प्रतिनिधी)- थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील जीवनाचा प्रेरणादायी संघर्ष दर्शविणाऱ्या ॲड. नदीम सय्यद लिखित असंही जगणं असतं..! (विश्व थॅलेसेमियाचे) या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक माधवीताई पाटील, राम म्हस्के, शिवाजी शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत पुस्तकात मांडण्यात आलेला थॅलेसेमिया रुग्णांचा संघर्ष इतरांसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. तर या पुस्तकाचे कौतुक करुन थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या कल्याणासाठी शासन भरीव योगदान देईल व त्यांच्यासाठी सकारात्मक पावले उचलले जाणार असल्याचे आश्वासन दिले.
थॅलेसेमिया रुग्णांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेले हे पहिले मराठी पुस्तक आहे. या पुस्तकात थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या जीवनावर आधारित काही सत्यकथा आहेत. पुस्तकात थॅलेसेमियाग्रस्त मुलांची मांडण्यात आलेली व्यथा वाचकांच्या मनाला भिडणारी आहे. पुस्तकामध्ये लेखकाने गरजू रुग्णांच्या माहितीसाठी वैद्यकीय मदत करणाऱ्या संस्थांची यादी देखील उपलब्ध करुन दिली आहे. लेखकाच्या मुलाचा थॅलेसेमियासदृष असाधारण अजार, तब्बल दहा वर्षांच्या उपचारासंबंधीचा संघर्ष व त्या संघर्षाला आलेले यश हा सगळा प्रवास यामध्ये मांडण्यात आलेला आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतही हार न मानता जीवन कसे जगावे? या पुस्तकातून शिकायला मिळते.
थॅलेसेमिया हा समाजामध्ये दुर्लक्षित झालेला जीवघेणा आजार आहे. यासंबंधी समाजाने जागृत होणे हाच मोठा यावर उपाय आहे. या आजारात रुग्णांच्या शरीरात रक्त तयार होत नाही. अशा रुग्णांना नियमितपणे बाहेरून रक्त घ्यावे लागते. साधारणपणे आजार जन्मजात असल्याने याचे रुग्ण लहान मुलेच असतात. रोज कित्येक नवीन रुग्णांची यामध्ये भर पडत आहे. दुर्लक्षित आजार प्रकाश झोतात आणण्याचे व त्याद्वारे जनजागृती करण्याचे काम पुस्तक करत आहे.
कधीही रक्तदान न केलेल्या बऱ्याच लोकांनी हे पुस्तक वाचून नियमितपणे रक्तदान करण्याचा संकल्प देखील केलेला आहे. जीवनात निराशा आलेल्यांसाठी एक सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम हे पुस्तक नक्कीच करणार असल्याची भावना लेखक ॲड. सय्यद यांनी व्यक्त केली.
लग्नापूर्वी मुलगा व मुलगी या दोघांची छोटीशी रक्त चाचणी करून या दोघांच्या विवाह संबंधातून होणाऱ्या अपत्यास आजार होण्याची शक्यता आहे किंवा नाही समजू शकते. या विषयाची जागृती या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एकंदरीत या पुस्तकामुळे थॅलेसेमियावर जनजागृती होण्यास मदत होणार आहे. स्टेमसेल डोनेशनने थॅलेसेमिया रुग्णांचे आयुष्य वाचू शकते. स्टेमसेल डोनेशन रक्तदान सारखे सुरक्षित असून, या पुस्तकातून स्टेमसेल डोनेशनला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.