किशोरवयीन मुलींना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन; आयुर्वेदिक सॅनेटरी नॅपकिन वापरण्याचा सल्ला
जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, मोगा शॉपी व जय युवा अकॅडमीचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुलींनी किशोर अवस्थेत शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या समस्यातून बाहेर पडून सकारात्मक दृष्टिकोनातून संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्य क्षेत्रात जनजागृतीचे, मार्गदर्शनाचे कौतुकास्पद कार्य जय युवा अकॅडमी करत असल्याचे प्रतिपादन महर्षी ग.ज.चितांबर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, मोगा शॉपी व जय युवा अकॅडमीच्या वतीने शहरातील महर्षी ग.ज.चितांबर कन्या विद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रोकडे बोलत होत्या. यावेळी आरोग्य सल्लागार हेमलता कांबळे, जय युवाचे संचालक ॲड. महेश शिंदे, माहेरच्या रजनीताई ताठे, समग्र परिवर्तनचे बाळासाहेब पाटोळे, समिद्रा पाटोळे, शिवगामिनी संस्थेचे ॲड. गायत्री गुंड, जय युवाच्या कल्याणी गाडळकर, आरती रासकर, जयश्री शिंदे, प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ, समृद्धी संस्थेच्या स्वाती डोमकावळे, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे आदी उपस्थित होते.
आरोग्य सल्लागार हेमलाता कांबळे यांनी दैनंदिन मिळणारे अन्नधान्य केमिकल युक्त आहे. व्यायामाचा अभाव, मोबाईलचा अतिरिक्त वापर यामुळे हार्मोन्समध्ये बदल होवून अनेक आजारांना किशोरवयीन मुली बळी पडत आहेत. बाजारात मिळणारे सॅनेटरी पॅड हे प्लास्टिक युक्त असून, त्यामध्ये रासायनिक घटक असतात. त्यामुळे कॅन्सर सारखे दुर्धर आजार भेडसावत आहे. आयुर्वेदिक सॅनेटरी नॅपकिन वापरणे आवश्यक झाले आहे. यावेळी प्रात्यक्षिकासह सॅनटरी नॅपकिन वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन शिक्षक गणेश उघडे यांनी केले. आभार गायत्री गुंड यांनी मानले.
या कार्यशाळेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, भाऊराव वीर, प्रवीण कोंढावळे, प्रियंका खिंडरे, माय भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, मोगाचे संचालक मोहन गायकवाड, डॉ. र्इसा शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
