• Wed. Dec 31st, 2025

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी नागपूरला शिक्षक परिषदेचे धरणे

ByMirror

Dec 8, 2025

15 प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक एकवटणार


शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे -बाबासाहेब बोडखे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (दि. 13 डिसेंबर) नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये “धरणे आंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.


प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि शासनाच्या धोरणांविरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी शिक्षक परिषदेने आंदोलन उभारले आहे. 15 मार्च 2024 चा अशैक्षणिक कार्यासंबंधी शासन निर्णय रद्द करावा, टिईटी परीक्षा बंधनकारक पात्रता अट रद्द करावी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना-अनुदानित/अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना जुन्या पेन्शनपासून वंचित करणारे 31 ऑक्टोबर 2005 (वित्त विभाग) आणि 29 नोव्हेंबर 2010 (शिक्षण विभाग) चे शासन निर्णय रद्द करावेत, वेतनअनुदानाच्या आधारे सर्व शाळांना वेतनेत्तर अनुदान द्यावे, शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करून फक्त अध्यापनासाठी नियोजित करावे, सहशालेय उपक्रमांची माहिती संगणकीय पद्धतीने पाठविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीव दराने मंजूर कराव्यात, शिक्षकांसाठी 10-20-30 आश्‍वासित प्रगती योजना लागू करावी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय योजना लागू करावी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना मुख्याध्यापक व लिपिक पदे मंजूर करावीत, चतुर्थ श्रेणी सेवकांची पदे पुनर्स्थापित करण्यात यावीत, महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देय करावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत बालवाटीका (वय 36) शिक्षणाला कायदेशीर शैक्षणिक दर्जा द्यावा, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


हे आंदोलन राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, मार्गदर्शक/कार्याध्यक्ष माजी शिक्षक आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे, संघटनमंत्री किरण भावठाणकर, सहसंघटनमंत्री दिलीप अहिरे, महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, तसेच नरेंद्र वातकर, गणेश पवार, योगेश बन, सुनील पंडित, एकनाथ दळवी, उमाकांत कुलकर्णी, गुलाबराव गवळे, राजेंद्र गुजरे आदी राज्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.


सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर दबाव आणण्यासाठी राज्यातील शिक्षक नागपूरला धडक होणार आहे. शिक्षकांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *