गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल शालेय शिक्षक राजेंद्र अरुण सोनवणे यांना जनआरोग्यम परिवार, जाणीव फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट रोजी संगमनेर येथे होणाऱ्या लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार 2025 सोहळ्यात सोनवणे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
राजेंद्र सोनवणे शनिश्वर प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक असून, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे नेवासा तालुकाध्यक्ष आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकास व गुणवत्ता वाढीसाठी ते विशेष उपक्रम राबवून गुणवंत विद्यार्थी घडवत आहे. शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहे. तसेच रायझिंग ट्रायबल फाउंडेशनचे संचालक व जगदंब प्रतिष्ठान (घोडेगाव) चे सचिव म्हणून काम पाहत असताना ते सामाजिक योगदान देखील देत आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा रायझिंग ट्रायबल फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद शिंदे यांनी सोनवणे यांचे अभिनंदन करुन, संघटनेमध्ये शिक्षकांच्या विविध प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच रायझिंग फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला आणखी बळकटी देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट केले.