• Wed. Oct 15th, 2025

महापालिका आयुक्तांवर झालेली कारवाई संशयास्पद ?

ByMirror

Jun 28, 2024

पत्रकार परिषदेत आंबेडकरी चळवळीच्या वतीने आरोप

फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा करणाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने महापालिका आयुक्तांवर झालेल्या कारवाईनंतर जातीय मानसिकतेतून आसुरी आनंद साजरा करण्यात आला असून, झालेली कारवाई देखील संशयास्पद असल्याची भूमिका आंबेडकरी चळवळीच्या वतीने शुक्रवारी (दि.28 जून) झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली आहे. तर महापालिके समोर आयुक्तांवर झालेल्या कारवाईचा आनंदोत्सव फटाके फोडून, पेढे वाटून साजरा करणाऱ्यांवर ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.


पत्रकार परिषदेसाठी अजय साळवे, सुमेध गायकवाड, सुशांत म्हस्के, रोहित आव्हाड, संजय कांबळे, सुनील क्षेत्रे, प्रतीक बारसे, सिद्धार्थ आढाव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, पवन भिंगारदिवे, संदीप वाघचौरे, संजय जगताप, विशाल गायकवाड, पोपट जाधव, विजय गायकवाड, जय कदम, विनीत पाडळे, गणेश गायकवाड, दानिश शेख आदींसह विविध आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते.


जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागासवर्गीय बौद्ध समाजातील अधिकारी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. आयुक्त त्यात दोषी आहेत की नाही? हा न्यायप्रविष्ट भाग आहे, पण मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने जातीयवादी प्रवृत्तीतून महापालिके बाहेर फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. काहींनी सोशल मीडियावर देखील आनंद साजरा केला. यामुळे सर्व आंबेडकरी समाज दुखावला गेल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.


महापालिकेत मागासवर्गीय बौद्ध असलेल्या आयुक्तांनी शहरातील सर्वच महामानवांच्या पुतळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावला. महापालिकेला शिस्त लावून उत्तम कारभार पाहून डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी शहरात ओळख निर्माण केली. जातीयवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांना मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यापुढे झुकणे मान्य नसल्याने त्यांना अडकविण्यात आले आहे. या कारवाईत एकूण सहा जणांची नावे चौकशीत होती. मात्र चार जणांना सोडून फक्त या दोघांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणात निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अन्यथा इतर चार व्यक्तींचे नाव व गाव देखील जाहीर करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सुरु असलेल्या चूकीच्या कारवाईचा भंडाफोड करण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.


सुमेध गायकवाड म्हणाले की, जातीयवादी प्रवृत्तीतून महापालिके समोर आनंद उत्सव साजरा करण्यात आल्याने मागासवर्गीय आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जातीयवादी प्रवृत्तीने आनंद साजरा करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतीक बारसे यांनी आयुक्तांवर झालेली कारवाई संशयास्पद आहे. जावळे यांनी महापालिकेत कारभार पाहताना कोणाच्याही दबावाला बळी न पडता चोख पद्धतीने काम केल्याने त्यांना अडकविण्यात आल्याचा आरोप केला.


रोहित आव्हाड म्हणाले की, कर्तव्यदक्ष अधिकारीवर त्यांच्या सुट्टीच्या काळात कारवाई करण्यात आली. महापालिकेत बोगस काम करण्यास त्यांनी थारा दिला नाही. नियमात काम करण्याची त्यांची पद्धत होती. मात्र काहींनी त्यांना टार्गेट करण्याच्या उद्देशाने अडकविले असल्याचे सांगितले. सिद्धार्थ आढाव यांनी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होण्याअगोदरच सोशल मीडियावर गुन्हा दाखल झाल्याचे पसरविण्यात आले. लाच घेतल्याची प्रत्यक्ष घटना घडलेली नसताना इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईचा आंबेडकरी समाज निषेध करत असल्याचे सांगितले.


सुशांत म्हस्के म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया प्रत्यक्ष रंगेहाथ पकडून गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन आयुक्तांवर झालेली कारवाई संशय निर्माण करते. आयुक्त रजेवर असताना ही कारवाई करण्यात आली. लाच प्रकरणाशी त्यांचा संबंध आहे किंवा नाही? याची चौकशी होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


अजय साळवे यांनी नाशिक विभाग, छत्रपती संभाजी नगर व अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोडून जालना येथील पथकाकडून झालेली कारवाई संशय निर्माण करणारी आहे. आयुक्त जावळे यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तम कार्य केले आहे. यापूर्वी देखील उपायुक्त व सध्या आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी उत्तम प्रकारे कार्य केले. जातीयवादी लोकांना मागासवर्गीय बौद्ध समाजातील अधिकारी नको होता, म्हणून त्यांच्यावर पूर्वनियोजित कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संजय कांबळे यांनी स्वच्छ कारभार करणाऱ्या आयुक्तांनी डबघाईस आलेल्या महापालिकेच्या उत्पन्नात वाढ केली, कर न भरणाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारुन मोठ्या प्रमाणात मनपाला उत्पन्न मिळवून दिल्याचे स्पष्ट केले. सुनिल क्षेत्रे यांनी चिरीमिरी घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी वचक बसविल्याने दुसऱ्याला पुढे करून त्यांनाच लाचेच्या जाळ्यात अडकविण्यात आल्याचा आरोप केला.


आयुक्तांवर झालेल्या कारवाई संदर्भात आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी घेणार पोलीस अधीक्षकांची भेट
समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने शनिवारी (दि.29 जून) 12 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदनाद्वारे समाजाच्या वतीने जातीय मानसिकतेतून आसुरी आनंद साजरा करणाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा व आयुक्तांवर सुरु असलेल्या संशयास्पद कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *