आलमगीरमधील कचऱ्याचा प्रश्न मार्गी
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तातडीच्या कारवाईबद्दल नागरिकांकडून समाधान
नगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता. रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग आणि त्यातून निर्माण होणारा दुर्गंध यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळ्याच्या दिवसांत या कचऱ्यातून साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असताना, अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सपकाळ यांनी या गंभीर प्रश्नावर आवाज उठवला. तर ग्रामविकास अधिकारी नेताजी भाबड यांचे आलमगीरमधील परिस्थितीवर लक्ष वेधले. भाबड यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश देऊन जेसीबीद्वारे कचऱ्याची साफसफाई करून घेतली.
कचऱ्याचे ढीग साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला होता. यापूर्वी देखील या भागात साथीचे आजार पसरल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदाही नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु वेळीच केलेल्या स्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला आहे.
संजय सपकाळ म्हणाले की, आलमगीरमधील कचऱ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित होता. वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. पुढे वेळोवेळी स्वच्छता मोहिम राबवली गेल्यास हा प्रश्न पूर्णपणे आटोक्यात आणता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी नेताजी भांबड यांचे विशेष आभार मानले. साफसफाईमुळे आता परिसर स्वच्छ झाला असून श्वास घेण्यासही दिलासा मिळाला आहे, याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.