• Tue. Feb 17th, 2026

विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सारसनगरला उत्साहात रंगला दिंडी सोहळा

ByMirror

Jul 17, 2024

पारंपारिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदूंगाचा निनाद व जय हरी विठ्ठलाच्या घोषाने नागरिक भारावले

अहमदनगर (प्रतिनिधी)- कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त सारसनगर भागातून उत्साहात दिंडी काढली. बाल वारकऱ्यांच्या दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणी व विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरले.


पारंपारिक वाद्यांच्या गजरात व लेझीम, झांज पथकासह दिंडी काढण्यात आली होती. पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुली डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या. टाळच्या गजरात ज्ञानोबा… तुकाराम… च्या जयघोषाने परिसर निनादला.


संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते यांच्या हस्ते पालखीचे पूजन करुन दिंडीला प्रारंभ करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संतोष सुसे, शिक्षक सविता सोनवणे, लता म्हस्के, निता जावळे, मीनाक्षी घोलप, सारिका गायकवाड, पेंटा मॅडम, राधाकिसन क्षीरसागर, योगेश दरवडे, भाऊसाहेब पुंड, अमोल मेहेत्रे, सचिन बर्डे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सारसनगर भागातील प्रमुख मार्गावरुन या दिंडीचे मार्गक्रमण झाले. दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या लहान वारकऱ्यांचे परिसरात उत्साहात स्वागत करण्यात आले. मुलींनी दिंडीत फुगड्यांचा फेर धरला होता. शाळेत विद्यार्थ्यांचा नियोजनबध्द रिंगण सोहळा पार पडला. यावेळी हातात भगवे ध्वज घेऊन विद्यार्थी धावले.


प्रा. शिवाजीराव विधाते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये दिंडीच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपसण्याचे कार्य होत आहे. अशीच परंपरा कायम ठेऊन विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण दिले जात आहे. बाल वारकऱ्यांची दिंडी पाहून पंढरपूरला आल्याचा भास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *