प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित प्रज्ञाशोध परीक्षा 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक व पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
या सोहळ्यास भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोकजी नगरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रतिष्ठान नगर केंद्राचे अध्यक्ष दादारामजी ढवाण होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह सोमनाथ दिघे, सहकार्यवाह माजी प्राचार्य डॉ. रवींद्र चोभे, कोषाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. रामचंद्र पवार, विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष माजी प्राचार्य अरुणराव कुलकर्णी, हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे सदस्य श्रीकांतजी वैद्य व अंजलीताई वैद्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने झाली. प्रज्ञाशोध परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला वाव देणारी आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करणारी परीक्षा असून, तिच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानस्पर्धेची प्रेरणा निर्माण होत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. अशोक नगरकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. “भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी केवळ पाठांतर नव्हे, तर प्रश्न विचारण्याची आणि शोध घेण्याची वृत्ती आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करताना सातत्य, जिज्ञासा आणि परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. पालकांनीही आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात दादारामजी ढवाण यांनी प्रज्ञाशोध परीक्षेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे आणि सतत ज्ञानवृद्धीचा ध्यास घ्यावा, असेही आवाहन केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, गौरवचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विशेषतः गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल, सुपा या शाळेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक मगर सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाशोध विभाग प्रमुख डॉ. अविनाश भांडारकर यांनी केले. त्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि यावर्षीच्या आयोजनाची माहिती सविस्तरपणे मांडली. त्यानंतर प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत यांनी वार्षिक अहवाल सादर करत परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशाचा आढावा घेतला.
पाहुण्यांचा परिचय डॉ. दादासाहेब काजळे यांनी करून दिला, तर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी डॉ. शर्मिला पारधे व डॉ. आश्लेषा भांडारकर यांनी वाचून दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका सोनाली गांगर्डे, साक्षी लोंढे, निकिता मोकाटे व अपर्णा हजारे यांनी आकर्षक शैलीत केले. आभार प्रा. विशाल जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. गोकुळदास लोखंडे, प्रा. विलास पांढरे, डॉ. प्रदीप शेळके, प्रा. रुपाली ओक, प्रा. सुनील वाकचौरे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. मनीषा वर्पे यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी शिक्षकांनीही कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.
