जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेची मागणी
पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक जबाबदारी आवश्यक -गोरक्षनाथ गवते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण विकास सरकार या संघटनेच्या वतीने वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणासमोरील गंभीर संकट या विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य शासनाने झाडे कापण्यावर पूर्णत: बंदी घालावी, तसेच बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
जागतिक पर्यावरण विकास सरकारचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी बोलताना गवते यांनी वाढत्या प्रदूषणावर तीव्र चिंता व्यक्त केली. “मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये प्रदूषणाने भयंकर स्वरूप धारण केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात सुमारे 42 टक्के वनक्षेत्र होते, आज ते 0.4%वर आले आहे अत्यंत चिंताजनक पातळीवर घसरले आहे. तरीही मानवाचा अट्टाहास सुरूच असून याचा थेट फटका पर्यावरणाला बसत आहे,” असे त्यांनी सांगितले.
झाडतोड थांबवली नाही, तर भविष्यात मानवासह सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गोरक्षनाथ गवते यांनी दिला.
दररोज हजारो-लाखो झाडांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आणून देत गवते म्हणाले की, “पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक भारतीयाने आपल्या परिसरातील झाडांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. झाडे वाचली तरच आपल्याला स्वच्छ ऑक्सिजन, स्वच्छ हवा आणि निरोगी जीवन मिळेल. त्यामुळे झाडतोड थांबवणे ही काळाची गरज आहे.” या कत्तलीमागे कोणाचे आशीर्वाद आहेत आणि ही प्रक्रिया नेमकी कधी थांबणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पर्यावरण संवर्धनासाठी पेपरलेस प्रणाली राबविण्याची गरज असल्याचेही या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. एमएसईबी (महावितरण) चे वीजबिल पूर्णत: ऑनलाइन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. काही भागांमध्ये ऑनलाइन बिलिंग सुरू झाले असले, तरी ते संपूर्ण महाराष्ट्र व देशभर लागू करणे गरजेचे आहे, असे उपस्थितांनी सांगितले.
“आज संपूर्ण जग डिजिटल झाले आहे. अनेक वृत्तपत्र देखील डिजीटलकडे वाटचाल करत आहे. वीजबिल मोबाईलवर येते, त्याच माध्यमातून पेमेंट करणे सोपे आहे. अशा परिस्थितीत कागदी बिलांची मागणी अयोग्य असून, कागदाचा वापर टाळणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मत बैठकीत मांडण्यात आले. या बैठकीस पोपटराव पटारे, निलेश साठे, महेश मंडलिक, सिताराम मंडलिक, गोविंद गडाख, दत्ता देवकर, मनोज देशमाने, नवनाथ गवते, अरुण गवते, गणेश भिटे, भाऊसाहेब मोरे, शिवाजी पालवे, अंबादास कांडेकर, पोपटराव महारनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
