रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी
अन्यथा 10 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सर्व अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक स्टॉल लावण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात वाढलेले अवैध धंदे त्वरीत बंद करावे, अवैध धंद्यांना अभय देणारे पोलीस निरीक्षकांची बदली करुन सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास 10 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सर्व अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक स्टॉल लाऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, जयश्री गायकवाड, मीना काळे, त्रिवेणी देवणे, सविता काळे, विमल लाळगे, मीराबाई आरु, अनिता भोसले, बाबासाहेब आरु आदी महिला उपस्थित होत्या.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगो व गुन्हेगारी जोमाने सुरू आहे. असे असताना देखील पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याबरोबरच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, दरोडा, लुटमार, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहेत. पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पांढरीपुल येथे एका हॉटेलच्या मागे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. या गुटख्याच्या धंद्यावर नाशिक येथील डीआयजी यांच्या पथकाने कारवाई केली असता, त्या ठिकाणी सुमारे एक कोटी रुपयांचा गुटखा ताब्यात घेण्यात आला. तरी देखील पोलीस निरीक्षक या प्रकरणाकडे लक्ष देत नाही. पोलिसांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सर्वात जास्त गांजा विक्री एमआयडीसी हद्दीत होताना दिसून येत आहे. अनेक युवक गांजाच्या नशाला बळी पडत असून, नशेमध्ये असलेल्या युवकांकडून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. त्यामध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. गांजाच्या नशेमुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. काहींचे संसार उध्वस्त झाले आहे. हातभट्टी पिऊन अनेक युवक मृत्युमुखी पडत आहेत. सोरट, बिंगो जुगार, मटका यामुळे रोजंदारीवर कमावलेले पैसे युवक गमावत आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सर्वच कुटुंब हतबल झाले असून, त्यांच्यावर कर्जाचे डोंगर झाले आहे. अनेकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर भागात न घाबरता दिवसाढवळ्या खुलेआम अवैध धंदे सुरू आहे. एमआयडीसी हद्दीतील सर्वच अवैध धंदे बंद होत नसतील, तर पोलीस निरीक्षक हे अकार्यक्षम असल्याचे जाहीर करून त्यांची बदली करून त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.