• Wed. Feb 11th, 2026

निमगाव वाघा येथे शिवजयंतीला राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

ByMirror

Feb 10, 2026

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन


शाहीरांच्या पोवाड्यांच्या सादरीकरणातून केली जाणार जनजागृती व अभिवादन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारे हे संमेलन बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी गावातील परिवार मंगल कार्यालयात उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.


या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ग्रामीण जीवन, सामाजिक प्रश्‍न, संस्कृती, परंपरा, परिवर्तन यांवर आधारित कविता, लेखन व विचारमंथन या संमेलनात पाहायला मिळणार आहे.


यावेळी शाहीरांच्या पोवाड्यांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व संत गाडगे महाराजांचे समाजप्रबोधन उपस्थितांना अनुभवता येणार आहे. साहित्याबरोबरच लोककला व परंपरेचे दर्शन घडवणारे हे संमेलन ग्रामीण भागातील साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, साहित्य, वैद्यकीय व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांना आणि संत गाडगे महाराजांच्या समाजसुधारणेच्या कार्याला अभिवादन करत आयोजित करण्यात आलेले हे संमेलन ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळ, सामाजिक जाणीव आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी असल्याचे डोफ्लगरे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *