सेवानिवृत्त कामगारांच्या हक्कासाठी संघटनेचा संघर्ष फळास
विना अपघात सेवा देऊनही सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो, हे मोठे दुर्दैव -बलभीम कुबडे
नगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त चालकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. सेवेत असताना 25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्या हस्ते चालक सतीश श्रीराम, अकुंश लोंढे, सुनिल क्षीरसागर, अशोक भैलुमे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त संघटनेचे केंद्रीय सदस्य बलभीम कुबडे, खजिनदार विठ्ठल देवकर, संघटक प्रमोद गाडळकर, महामंडळाचे अधिकारी, पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी महामंडळातील चालकांनी कार्यरत असताना 25 वर्षे विना अपघात सेवा दिली होती. मात्र त्यांचा योग्य सन्मान झालेला नव्हता. यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, अहिल्यानगर विभागाने सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर चालकांना त्यांचा हक्काचा सन्मान मिळवून देण्यात आला.
बलभीम कुबडे म्हणाले की, सेवानिवृत्त कामगारांचे न्याय-हक्क मिळवून देण्याचे कार्य संघटना सातत्याने करत आहे. मात्र संघर्षाशिवाय हक्क पदरात पडत नाहीत. 25 वर्षे विना अपघात सेवा देऊनही सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो, हे मोठे दुर्दैव आहे. कामगारांच्या पेन्शन, थकीत देयके व करार विषयक मागण्यांसाठी आम्हाला पुढे आंदोलन उभारावे लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सेवानिवृत्त झालेल्या चालकांचा सन्मान होण्यासाठी संघटनेचे अर्जुनराव बकरे, गोरख बेळगे, गंगाधर कोतकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सत्कारमुर्तींनी हक्काचा सन्मान मिळवून दिल्याबद्दल संघटनेचे आभार मानले.