आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपत आहे -सुनील कटारिया
125 रुग्णांची मोफत मेंदू विकार तपासणी
नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला जात आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना दूर करण्याचे काम हे आरोग्य मंदिर करत आहे. आचार्य श्री आनंदऋषीजींच्या जयंतीनिमित्त आरोग्य सेवेच्या महायज्ञाचे कुंड प्रज्वलीत झाले असून, यामध्ये सेवा देण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले असून, या महायज्ञातून अनेक गरजू रुग्णांना आधार मिळणार असल्याची भावना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल अहिल्यानगरचे अध्यक्ष
सुनील कटारिया यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त स्व. माणकचंदजी पुखराज कटारिया यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल अहिल्यानगरच्या माध्यमातून मेंदू विकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुनील कटारिया बोलत होते. यावेळी सचिव अमर गुरप, डॉ. शिरीष कटारिया, वसंत मुनोत, विनोद भंडारी, चंद्रकलाबाई कटारिया, संजय कटारिया, सुजाता कटारिया, राजश्री चंगेडिया, संजय मुनोत, करुणा कटारिया,
न्युरोलॉजी डॉ. गौतम काळे, डॉ. अद्वैत गीते, डॉ. वैशाली कदम, संतोष बोथरा, सतीश लोढा, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी आदी उपस्थित होते.
पुढे सुनील कटारिया म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेतून ईश्वरसेवा सुरु आहे. या मानवतेच्या सेवा कार्यात कटारिया परिवारचे व रोटरीचे नेहमीच सहकार्य राहणार आहे. हॉस्पिटलच्या सेवा कार्यामुळे जिल्ह्याचे नाव भारतभर झाले असून, वैद्यकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तर
रोटरी क्लबची माहिती देऊन वडिलांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन हा सामाजिक वारसा पुढे घेऊन जात असल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी अहिल्यानगरसह 6 जिल्ह्यात आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा पोहचवली जात आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या दारा पर्यंत ही सेवा घेऊन जाण्याचे कार्य सुरु आहे. अंतिम घटकापर्यंत रुग्णसेवा पोहचवून आचार्य आनंदऋषीजी यांचे स्वप्न साकारण्यात आले आहे. टाकळी ढोकेश्वर येथील कटारिया परिवाराचे नेहमीच या सेवा कार्यात योगदान मिळत आहे. स्व. माणकचंदजी कटारिया यांच्यानंतर त्यांची दुसरी पिढी या सेवा कार्यात जोडली गेली आहे. सर्वांची सद्भावना व योगदानाने प्रत्येक घरात ही रुग्ण सेवा पोहोचत आहे. 9 सप्टेंबर पर्यंत हॉस्पिटलमध्ये विविध शिबिर चालणार आहेत. जिल्ह्यातील 850 वैद्यकिय सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही रुग्णसेवा पोहचविली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. अद्वैत गीते म्हणाले की, मेंदूवरील खर्चिक उपचारासाठी लाखो रुपये लागतात. मात्र आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अल्पदरात ही सेवा दर्जेदार पध्दतीने मिळत आहे. तीन मेंदू विकार तज्ञ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून, अद्यावत तंत्रज्ञान सुविधांचा लाभ रुग्णांना दिला जात आहे. तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत हे उपचार मोफत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. गौतम काळे यांनी मेंदूवरील विविध थेरपी, उपचार, डोकेदुखी, जेबीएस, पॅरालिसिस, स्मृतीभंश व डोक्यांचे दुर्मिळ आजारावर हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध असून, तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून अनेक रुग्ण बरे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिरात 125 रुग्णांची मोफत मेंदू विकार तपासणी करण्यात आली. तर गरजूंवर अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.